काय सांगता ! होय, 50 रूपये लिटरनं मिळू शकतं पेट्रोल, जाणून घ्या ‘कसं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज अचानक कच्च्या तेलाच्या किमती कमी करून सौदीच्या राजाने संपूर्ण जगालाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. याचा परिणाम शेअर बाजारात देखील पहायला मिळाला. त्यांच्या या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना तब्बल ५ लाख डॉलरचे नुकसान झाले आहे. असे असले तरी ही एक आनंदाची बातमी आहे कारण कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने भारतात आज ७६ रुपयांना असणारे पेट्रोल थेट ५० रुपयांपर्यंत कमी होऊ शकते.

भारत हा चीननंतरचा सर्वात मोठा असा देश आहे जो की पेट्रोल, डिझेल आणि अन्य पेट्रोलियम पदार्थांची आयात करतो. त्यामुळे परकीय गंगाजळीवर भारताचा मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो. त्यामुळे या किंमत कपातीच्या निर्णयामुळे भारताच्या तिजोरीला मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून याचा थेट फायदा वाहन चालकांनाही होण्याची शक्यता आहे.

सौदी अरेबियाच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती तब्बल ३० टक्क्यांनी घसरल्या आहेत. दरम्यान समोर आले की सौदीने रशियाचा बदला घेतला असून रशियाला सौदीने विनंती केली होती की तेलाच्या उत्पादनात घट करावी. मात्र रशियाने पाठ फिरवून सौदीच्या विनंतीला काडीमोल देखील भाव दिला नाही. यामुळेच सौदीने तेलाचे भावच कमी केले आहेत.

दरम्यान या दोन्ही देशांमध्ये जर हे शीतयुद्ध असेच सुरु राहिले तर याचा थेट फायदा लोकांना होणार आहे. आज भारताच्या क्रूड बास्केटची किंमत ही प्रति बॅरल ४७.९२ डॉलर इतकी आहे. म्हणजेच एका बॅरलसाठी ३५३०.०९ रुपये खर्च येत असतो. अशा परिस्थितीत जर ३० टकक्यांनी कपात झाली तर भारताचे १००० रुपये वाचणार आहेत. म्हणजेच पुढच्या वेळी बॅरल खरेदी करताना २४७० रुपयांना मिळेल. सरकारने जर सर्वसामान्यांना याबाबत लाभ द्यायचे ठरविले तर काही दिवसांनी पेट्रोल ५० रुपयांपर्यंत मिळू शकते.