ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारविरोधात दिल्ली पोलिसांची लूक आऊट नोटीस; जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली : वृत्त संस्था – छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या भांडणात 23 वर्षीय कुस्तीपटू सागर राणाचा मृत्यू झाला होता. त्याप्रकरणात ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार याच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी लूक आऊट नोटीस बजावली आहे. सुशील कुमारच्या घरावर पोलिसांनी नुकताच छापा टाकला होता. मात्र, सुशील कुमार फरार आहे.

मॉडेल टाऊन परिसरातील फ्लॅट रिकामा करण्यासाठी हा वाद सुरू होता. प्रिन्स दलालला या प्रकरणात सुरुवातीला अटक केली. सुशील कुमार, अजय, प्रिंस दलाल, सोनू, सागर, अमित आणि त्याचे इतर साथीदार भांडणात सहभागी होते. हा वाद 4 मे रोजी झाला होता. त्यामध्ये झालेल्या हाणामारीत दोघे जखमीही झाले होते. त्यानंतर सागरला तातडीने रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दिल्ली पोलिसांकडून एनसीआर आणि जवळपासच्या राज्यांत छापा टाकला जात आहे.

दरम्यान, एफआयआरमध्ये सुशील कुमारचेही नाव असल्याने त्याच्यासह इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून छापेमारीची कारवाई सुरु आहे. सुशील कुमार सापडल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा होईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सुशील कुमारने दिले होते स्पष्टीकरण…

आम्ही पोलिस अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे, की काही अनोळखी व्यक्तींनी आमच्या आवारात उडी मारुन भांडण केले. आमच्या स्टेडियमचा या घटनेशी काही संबंध नाही, असा दावा सुशील कुमार याने केला होता.