राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटूंचा टॉयलेटजवळ बसून रेल्वेप्रवास 

मुंबई : पोलीसनामा – अयोध्येतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतून पाच पदकांची कमाई करून राज्यात परतणाऱ्या कुस्तीपटूंना रेल्वे प्रवासात टॉयलेटजवळ बसून २५ तासांचा प्रवास करावा लागल्याची संतापजनक घटना घडली आहे. अयोध्येतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या संघात १० महिला आणि २० पुरुष पैलवानांचा समावेश होता. रेल्वे प्रवासात त्यांच्यासाठी साधी जागाही आरक्षित नव्हती. काहींचा अपवाद वगळता इतरांना अनारक्षित डब्यातूनच प्रवास करावा लागला.

या प्रकरणात संतापाची भर टाकणारा आणखी एक प्रकार म्हणजे एकीकडे रेल्वेतील शौचालयाजवळ बसून २५ तासांचा प्रवास कुस्तीपटूंनी केला असताना दुसरीकडे अयोध्येला गेलेले बिनकामाचे पदाधिकारी मात्र विमानाने घरी परतले आहेत. या प्रवासातील छायाचित्रे कुस्तीपटूंनी सोशल मीडियावर शेअर केली आहेत. महाराष्ट्रातील कुस्तीपटू फैजाबाद येथून साकेत एक्स्प्रेसने निघाले होते. पावणे पाच वाजण्याच्या सुमारास एक्स्प्रेस मनमाडमध्ये पोहोचली. महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या या खेळांडूवर अशी वेळ येणे राज्याच्या दृष्टीने नामुष्की आहे.

राम मंदिरावरुन देशात दंगली घडवण्याचा कट : राज ठाकरे
मुंबई : पोलीसनामा – आताच्या सरकारकडे बोलण्यासाठी काही नाही. त्यामुळे हे हिंदू-मुस्लीम दंगली लावून देत आहेत. दंगली शिवाय यांच्याकडे कोणताच मार्ग राहिलेला नाही. पुढच्या काही दिवसांमध्ये राम मंदिराच्या नावावर ओवेसींसारख्या लोकांना हाताशी घेऊन दंगली घडवल्या जातील, असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. विक्रोळी कन्नमवार नगर येथील सभेत ते बोलत होते. भाजपवर टीका करताना राज ठाकरे यांनी आवेसी यांच्यावरही निशाणा साधल्याने आगामी काळात आरोपप्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील या सभेत राज ठाकरे म्हणाले, राममंदिर झाले पाहिजे का? तर झालेच पाहिजे, पण निवडणुकीनंतर झाले तरी चालेल, असे मी गुढीपाडव्याच्या सभेत बोललो होतो, आता हे दंगलीवर मतं मागायला निघाले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्यावर टीका करताना ठाकरे म्हणाले, भगवे कपडे घालून फिरतात. मुख्यमंत्री आहेत की कोण आहेत हेच कळत नाही. जातींमध्ये आगी लावण्याचे काम करत आहेत. त्यादिवशी त्याला साक्षात्कार झाला म्हणे हनुमान दलित आहे. यांच्या सभा सुरू आहेत. वांद्रे येथे रविवारी विहींपची ही सभा झाली. तुम्ही सतर्क राहा. मुंबई पोलिसांनी बघावे काय राजकारण सुरू आहे, असे आवाहन राज यांनी पोलिसांना केले. मुख्यमंत्री योगींनी एका भाषणामध्ये ओवेसीचा उल्लेख केला, ही सुरुवात आहे, असे ते म्हणाले.

उत्तर भारतीयांच्या सभेतील भाषण कसे होते. हिंदी कशी होती. काल जे बोललो त्या महाराष्ट्रासमोर खऱ्या समस्या आहेत. बाहेरच्या लोंढ्यामुळे शहरावर ताण वाढत आहे. महाराष्ट्रात बेरोजगारी वाढत आहे. हा चिंतेचा विषय असून देशाचे राजकारण भलतीकडे सरकवले जात आहे. मला सकाळी दिल्लीवरुन आलेला एक फोन हा अत्यंत गंभीर होता. त्यात ओवेसीशी चर्चा सुरू असून देशात दंगली घडविण्याचे कारस्थान सुरू आहे, असे सांगण्यात आल्याचा गौप्यस्फोट राज यांनी केला.