Jalgaon News : ‘या’ प्रकरणात लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा

जामनेर/जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन –   ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नेमाडे यांच्या हिंदू : जगण्याची समृध्दी अडगळ… या कादंबरीत लभान गोरबंजारा समाजातील महिलांबाबत अपमानजनक लिखाण करण्यात आले आहे. याच्या निषेधार्थ त्यांच्यावरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अ‍ॅड. भरत पवार यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

अ‍ॅड पवार यांच्या तक्रारीवरुन नेमाडे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जामनेरचे तहसीलदार अरुण शेवाळे यांच्याकडे एक लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी नेमाडे यांना दिलेला ज्ञानपीठ पुरस्कार परत घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. पुस्तकाचे प्रकाशक हर्ष भटकळ यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

तहसीलदार यांना निवेदन देताना रमेश नाईक, निलेश चव्हाण, चतरसिंग राठोड, अ‍ॅड. भरत पवार, दीपक चव्हाण, विकास तंवर, इंदल जाधव पुष्पा राठोड, चेतन नाईक, गणेश राठोड, ऐश्वर्या राठोड, अंजु पवार, देवीदास राठोड, संदीप जाधव इत्यादी उपस्थित होते.