पोलिस भरतीसंदर्भात मोठा निर्णय ! 11 हजार रिक्त जागांसाठी भरती, आता मैदानी चाचणीनंतर लगेचच…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य पोलीस दलात जवानांच्या भरतीचे निकष बदलले जाणार असून, पोलीस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या निकषानुसार लवकरच 11 हजार रिक्त जांगांची भरती मोहीम राबविण्यात येईल. यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील भरतीचे निकष बदलण्यात येणार असून याबाबतचा शासन आदेश गृहमंत्रालयाकडून काढण्यात येणार आहे.

बदलत्या निकषामुळे पोलीस दलास सक्षम जवान मिळणार असून याचा लाभ ग्रामीण भागातील युवकांना होणार असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनाम्यात याबातचे सूतोवाच केले होते. त्यामुळे आधीच्या सरकारच्या काळातील निकष बदलून नवीन निकषानुसार 11 हजार जागांच्या पोलीस भरतीची प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलीस भरतीसाठी सध्या पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जात होती. त्यानंतर शारीरिक क्षमता सिद्ध करण्यासाठी मैदानी चाचणी घेतली जात होती. दोन्ही चाचण्यांतील एकूण गुणांच्या आधारे अंतिम निवडीची यादी जाहीर करण्यात येत होती. या निवड प्रक्रियेमुळे लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेले अनेक उमेदवार पुढे शारीरिक चाचणीत अनुत्तीर्ण होतात. परिणामी पोलीस दलात योग्य आणि सक्षम जवान मिळण्यास अनेक अडचणी येत होत्या.

ही बाब लक्षात घेऊन पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी अगोदर मैदानी आणि नंतर लेखी परिक्षा घ्यावी अशी मागणी करण्यात आली होती. पोलीस भरतीची प्रक्रिया दुरुस्तीनंतर उमेदवारांना अनेक नव्या बदलांना सामोरे जावे लागणार आहे. उमेदवारांना 1600 किंवा 100 मिटर अशा दोन गटांमध्ये धावावे लागणार आहे. तसेच गोळाफेक, लांब उडी, पुलअप्स या प्रकाराची 100 गुणांची शारीरिक चाचणी द्यावी लागणार आहे.

यापूर्वी लांब उडी आणि पुलअप्स हे दोन प्रकार वगळ्यात आले होते. आता त्यांचा नव्याने समावेश करण्यात येणार आहे. या नव्या दुरुस्तीमुळे पोलीस दलास ताकदवान मनुष्यबळ उपलब्ध होईल. तसेच याचा अधिक फायदा ग्रामीण भागातील उमेदवारांना होईल असे पोलीस भरती मार्गदर्शन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/