रेसलिंग सुपरस्टार ‘द अंडरटेकर’नं WWE ला केलं Good Bye ! म्हणाला- ‘माझा काळ संपला…’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेसलिंग सुपरस्टार द अंडरटेकर (The Undertaker) च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. अंडरटेकरनं डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू युनिव्हर्स (WWE Universe) ला गुड बाय केलं आहे. अंडरटेकरला सर्व्हाईवर सीरिजदरम्यान खूपच भावनात्मकरित्या निरोप दिला गेला आहे. अंडरटेकरचं खरं नाव मार्क विल्यम कॅलवे (Mark William Calaway) आहे.

अंडरटेकरनं 22 नोव्हेंबर 1990 रोजी सर्व्हाईवर सीरिजमधूनच WWE च्या जगात पाऊल टाकलं होतं. जगभरात त्याची फॅन फॉलोविंग आहे. रविवारी (दि. 22 नोव्हेंबर) त्याच्या करिअरचं 30 वं वर्ष होतं. या दिवशी त्यानं अखेरचा WWE च्या रिंगमध्ये पाऊल टाकलं.

अंडरटेकर म्हणाला, रिंगमध्ये माझा काळ संपला आहे. आता अंडरटेकरला गुडबाय करा. यावेळी (WWE) लिजेंड ट्रीपल एच, शॉन मायकल, रिक प्लेअर, केन हेही उपस्थित होते. त्यांनी अंडरटेकरला 30 वर्षांच्या करिअरसाठी शुभेच्छाही दिल्या.

गेल्याच आठवड्यात एका मुलाखतीत बोलताना अंडरटेकर म्हणाला, त्याला त्याच्या करिअरवर गर्व आहे. आता अचिव्हमेंट आणि लोकांचं अपार प्रेम पाहून आणखी कसल्या गोष्टीची इच्छा नाही राहिली, असंही तो म्हणाला आहे. लोकांनी मला खूप प्रेम दिलं, हीच माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी अचिव्हमेंट आहे.