‘त्या’ गुन्ह्यात माजी आमदार शंकरराव गडाख यांना जामीन

नेवासा (जि. नगर) : पोलीसनामा ऑनलाइन – नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे दोन वर्षांपूर्वी केलेल्या पाटपाणी, हमीभाव, संपूर्ण कर्जमाफी आदी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी नेवासा न्यायालयाने माजी आमदार शंकरराव गडाख यांना जामीन मंजूर केला आहे. त्यांना 31 ऑगस्ट रोजी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.

पाटपाणी, हमीभाव, संपूर्ण कर्जमाफी आदी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर माजी आमदार गडाख यांच्या नेतृत्वाखाली वडाळा बहिरोबा येथील नगर-औरंगाबाद महामार्गावर करण्यात आलेले रास्ता रोको आंदोलन संपूर्ण राज्यात गाजले होते. त्यांच्यासह अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यास भाग पडल्याची चर्चा होती. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1957चे कलम 37(1)(3) चे उल्लंघन तसेच 135 प्रमाणेचा आदेशाचा भंग म्हणून शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली होती. गडाख यांच्यासह कॉम्रेड बाबा आरगडे, बन्सी सातपुते, सुनील गडाख, संभाजी माळवदे, भाऊसाहेब मोटे, नानासाहेब तुवर यांच्यासह अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते.

याप्रकरणी वारंवार आदेश देऊनही गडाख यांच्यासह काही आंदोलक न्यायालयीन कामकाजासाठी उपस्थित राहत नसल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात येऊन अजामीनपात्र अटक वॉरंट काढले होते. यानंतर गडाख यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी सोनई, शनिशिंगणापूर, नगर परिसरात शोध घेतला होता. न्यायालयाने गडाख यांना 31 ऑगस्ट रोजी उपस्थित राहण्याची शेवटची संधी दिली होती.

जामीन मिळाल्यावर माध्यमांशी बोलताना गडाख म्हणाले की, 4 महिन्यापूर्वी मला वॉरंट निघाले होते. परंतु अतिशय नियोजनपूर्वक लोकप्रतिनिधींनी पोलीस यंत्रणेवर दबाव टाकून वॉरंट आपल्यापर्यंत पोहचू दिले नसल्याचा गंभीर आरोप केला. पोलिसांनी मी नगरच्या निवासस्थानी नसताना घराची झाडाझडती घेतली. कायद्याचा आदर करून रीतसर जामीन घेतला आहे. ज्या ज्या वेळेस पाटपाणी प्रश्न असो की शेतकरी अडचणीत येईल, त्यावेळेस शांत न बसता आंदोलन करण्याचा निर्धार शंकरराव गडाख यांनी बोलून दाखविला.
आरोग्यविषयक वृत्त –