10 वी – 12 वी च्या परीक्षा यावर्षी उशिरा, शिक्षणमंत्री गायकवाड यांचे संकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाचा घटक परीक्षा असून, या परीक्षा पद्धतीत कोणताही आमूलाग्र बदल अपेक्षित नाही. मात्र, यंदा दहावी बारावीच्या परीक्षा उशिरा होतील, असे सूतोवाच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा २०२१ मध्ये एप्रिल महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात अथवा मे महिन्याच्या सुरुवातीस होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.

वर्षा गायकवाड म्हणाल्या, कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण सुरु असून, विद्यार्थ्यांना व शिक्षकांनाही समस्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. आताच्या परिस्थितीत तंत्रज्ञान व अध्ययन व अध्यापन प्रक्रिया बदलण्यात आली, त्यासाठी तंत्रज्ञान फोरम तयार करण्यात येत आहे. शाळेतील शिक्षण, शिक्षण तज्ञ, शिक्षण अधिकारी, एनसीआरटी व बालभारतीच्या संयुक्तपणे शिक्षण क्षेत्रातील बदलांचा व नव्या आव्हानांचा आढावा घेत आहे व भविष्यातील शिक्षक हा अधिक तंत्रस्नेही असेल याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र, शाळा सुरु नसलेल्या ठिकाणी ऑनलाइन माध्यमातून शिक्षक पद्धती सुरु आहे. कोरोना दरम्यान शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनी दाखवलेला संयम व आत्मविश्वास कौतुकास्पद असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यास प्रयत्नशील

महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीमध्ये शिक्षण विभागाच्या आढाव्यात गायकवाड यांनी म्हटलं की, राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना तयार केले जाईल. तसेच, जिल्हा पातळीवर सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शालेय शिक्षणासोबत सहशालेय उपक्रम, आधुनिक भौतिक सुविधा देण्यासाठी सरकारने योजना सुरु केल्या असल्याच्याही त्या म्हणाल्या.