‘ऑनलाइन’ विकले जातात ‘या’ कंपनीचे सर्वाधिक मोबाईल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या अनेक दिवसांपासून ऑनलाइन मार्केटने भारतात मोठ्या प्रमाणावर आपले पाय रोवले आहेत. वस्तूंवर मोठ्या प्रकारे ऑफर आणि डिस्काउंट मिळत असल्याने ऑनलाइन पद्धतीने ग्राहकही खरेदी करत आहेत. ऑनलाइन पद्धतीने सर्वच फोनची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. भारतात २०१९ च्या पहिल्या सहा महिन्यांत ऑनलाइन मोबाइल खरेदीचा आलेख हा २६% नी वाढला आहे. तर ऑफलाइन म्हणजेच दुकानात जाऊन फोन खरेदी करण्याचं प्रमाण हे ४% नी घटलं आहे.

ओपो, सोनी, नोकिया, सॅमसंग एवढेच काय पण आयफोन सुद्धा आता ऑनलाइन मार्केटमध्ये योग्य किमतीला मिळत आहे. २०१९ या वर्षांत शाओमी कंपनीनं सर्वाधिक ऑनलाइन मार्केटवर आपला जम बसवला आहे. ४६ % ऑनलाइन मोबाइल खरेदीचं जाळं हे शाओमी कंपनीनं व्यापलं असल्याचं काऊंटर पॉईंट मार्केट मॉनिटरच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

नव्यानं लाँच होणारे फोन्स त्यावर दिल्या जाणाऱ्या आकर्षक सवलतींमुळे ऑनलाइन खरेदीचं प्रमाण वाढलं आहे. शाओमीच्या रेड मी नोट ७ प्रो, रेड मी ६A तसेच नव्या आलेल्या के २० आणि प्रो वर मोठ्या प्रमाणावर ऑफर असल्यामुळे हे मोबाइल जास्त प्रमाणात विकले जात आहेत.

शाओमीचे सगळेच फोन पंधरा ते वीस हजारांच्या रेंज मध्ये आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना याचे आकर्षण आहे म्हणूनच यांची विक्री ऑनलाइन पद्धतीने मोठ्या प्रमाणावर होत आहे.