२००२ गोध्रा प्रकरण : याकुब पटालियाला जन्मठेप

अहमदाबाद : वृत्तसंस्था – २००२ साली झालेल्या गोध्रा प्रकरणातील आरोपी याकुब पटालिया याला विशेष एसआयटी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. घटनेच्या १६ वर्षांनंतर पोलिसांना याकुब पटालियाला अटक करण्यात यश आलेलं होतं. त्यानंतर ६४ वर्षीय पटालिया याला पोलिसांनी एसआयटीच्या स्वाधीन केले होते.

२७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा स्टेशनवर उभ्या असलेल्या साबरमती एक्सप्रेसचे डबे पेटवून देण्यात आले होते. या घटनेत ५९ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेवेळी याकुब साबरमती एक्सप्रेसला पेटविणाऱ्यांपैकी एक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर याकूब विरोधात २००२ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. भादवि ३०७ नुसार जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकऱणी तसेच इतर कलमांतर्गत त्याच्यावर खटला सुरु होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार झाला होता. तसेच अटकेपासून वाचत होता. या प्रकरणी याकुबचा भाऊ कादिर पटालिया याला २०१५ मध्ये अटक केली होती. त्याचा सुनावणीदरम्यान मृत्यू झाला होता.

ऑक्टोबर २०१७ मध्ये गुजरात उच्च न्यायालयाने याप्रकऱणी ११ दोषींना दिलेल्या मृत्यू दंडाच्या शिक्षेचे रुपांतर नंतर जन्मठेपेत करण्यात आले आहे. तर २० जणांना जन्मठेप कायम ठेवली होती. तर याप्रकरणी कनिष्ठ न्यायायलयाने ३१ आरोपींना दोषी ठरवत ६३ जणांची सुटका केली होती.