‘त्या’ अपघातामुळे अभिनेत्रीचं IAS अधिकारी होण्याचे स्वप्न राहिलं अपूर्ण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  सुप्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम हीने विकी डोनर, उरी, बाला यासारख्या सुपरहिट चित्रपटात भूमिका साकारली आहे. मात्र, यामी गौतमला अभिनय क्षेत्रात करिअर करायचे नव्हतं. तिला आयएएस (IAS) अधिकारी बनायचे होते. परंतु एका अपघाताने तिचे आयएएस होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलं. मागिल वर्षी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्याला अभिनेत्री नाही तर आयएएस अधिकारी व्हायचे होते असे सांगत तिने आपल्या अपघाताविषयी सांगितले.

कॉलेजमध्ये असताना तिचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये तिच्या मानेला गंभीर दुखापत झाली. कॉलेजला जात असताना एका कारने तिला धडक दिली होती. यामी गौतमने मुलाखतीत सांगितले की, मी त्यावेळी चंदीगडमधील विद्यापीठात दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने आलेल्या एका कारची धडक दुचाकीला बसली. सुदैवाने मी हेल्मेट घातलं होतं. त्यामुळे माझ्या डोक्याला मार लागला नाही. मी एवढ्या जोरात पडले की, मला उठून उभारता देखील येत नव्हते. मानेला जबर धक्का बसल्याने मानेत फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मी कधीच वर्कआऊट करु शकणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. या अपघातामुळे मझे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याचे यामीने मुलाखतीत सांगितले.

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये मी नियमित योगसाधना केली. याचा खुप फायदा झाल्याचे यामीने सांगितले. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने आपल्या चाहत्यांना विनंती केली होती. एखादा व्यक्ती कसा आहे त्याच्या दिसण्यावरुन ठरवू नका. तो व्यक्ती बाहेरुन जरी फिट दिसत असला तरी त्याने केलेला संघर्ष त्यालाच माहित असतो. यामी गौतम 2020 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला गिन्नी वेड्स सनी या चित्रपटात झळकली होती. यामी गौतम भूत पोलीस, दसवी या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.