यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सेटचा विंग पडून रंगमंच सहायक ठार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – नाटकाचा सेट लावण्यापूर्वी नाट्यगृहातील बाजूला काढून ठेवलेल्या लोखंडी विंग पडल्याने रंगमंच सहायकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री उशीरा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात विंग काढून ठेवत असताना ती अंगावर पडली त्यात जखमी होऊन त्या सहायकाचा मृत्यू झाला. विजय महाडिक असे त्यांचे नाव आहे.

महापालिकेच्या सेवेत असलेले विजय महाडिक हे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या स्थापनेपासून तेथे रंगमंच सहाय्यक म्हणून काम करत होते. त्यांनी तत्पुर्वी काही काळ अतिक्रमण विभागात काम केले होते. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शुक्रवारी रात्री ऑक्रेस्ट्राचा कार्यक्रम होता. तर, शनिवारी (२३ मार्च) ‘हॅम्लेट’ नाटकाचा प्रयोग होता. या नाटकाचा सेट लावण्याचे काम त्यांनी मध्यरात्रीनंतर सुरू केले. मात्र, नाटकाचा सेट लावताना नाट्यगृहातील विंगा बाजूला काढून भिंतीला लावत असताना लेव्हलचा टेकू लावण्यात आला होता. मात्र, इतर साहित्याची हलवाहलव करताना लेव्हल सरकवण्यात आल्या आणि भिंतीला असलेल्या लोखंर्डी विंग महाडिक यांच्या डोक्यावर पडल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन झाल्यानंतर महाडिक यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. महाडिक यांच्यामागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.