आंदोलनावेळी शिवसैनिकांचा राडा, खासदारासमोरच विमा अधिकाऱ्याला मारहाण

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – शेतकरी विम्याच्या मागणीसाठी खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वाखाली जबाब दो आंदोलन करण्यात आले. मात्र यावेळी शिवसैनिक जवाब विचारण्यासाठी विमा कंपनीच्या कार्यालयात गेले असता, मॅनेजरने समाधानकारक उत्तर न दिल्याने संतप्त झालेल्या यवतमावळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी मॅनेजरला मारहाण केली. खा. गवळी यांच्यासमोरच हा सर्व प्रकार घडला.

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामामध्ये अतोनात नुकसान झाले. मात्र विमा कंपनीने मोजक्याच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी यासाठी विमा कंपनीवर मोर्चा काढला होता. खासदार भावना गवळी यांनी स्थानिक स्टेट बँक चौकातून जवाब दो आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर आंदोलक जाब विचारण्यासाठी विमा कंपनीच्या कार्यालयात गेले. या ठिकाणी मॅनेजरने समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांना खुर्चीतून ओढून शिवसैनिकांनी त्यांना मारहाण केली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत शिवसैनिकांना शांत केले.

दरम्यान, या आंदोलनात जिल्ह्यातील हजारो शेतकरी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान विमा कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मात्र या आंदोलनातून सेनेतील गटबाजी उघड झाली झाली. पालक मंत्री संजय राठोड यांचा कोणत्याही बॅनरवर फोटो वापरण्यात आला नाही. शिवाय पालकमंत्री गटाचा एकही पदाधिकारी आंदोलनावेळी तिकडे फिरकला नाही.