अवनीच्या बछड्याला पकडण्यासाठी वन अधिकारी स्वत: पिंजऱ्यात

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – यवतमाळ जिल्ह्यात धुमाकूळ घालत तब्बल १३ जणांना ठार करणाऱ्या अवनी वाघिणीला ठार करण्यात आले . त्यानंतर आता तिच्या नर बछड्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग प्रयत्न करीत आहे. दरम्यान या बछड्याला पकडण्यासाठी यामध्ये वन विभागाचे तज्ज्ञ पशुसंवर्धन अधिकारी थेट पिंजाऱ्यात बसून या बछड्याला बेशुद्ध करुन जेरबंद करणार आहेत.

C2 बछडी जेरबंद

त्यानंतर अवनी वाघिणीचे दोन लहान बछडे अंजी परिसरात ६५५ कंपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होते. तिथेच वन विभागाने साडेतीन किलोमीटर तारेची आणि जाळीचे कुंपण करुन, मध्य प्रदेशातील चार हत्तीच्या साहाय्याने बछड्यांना जेरबंद करण्यासाठी मोहीम राबवली. त्यात २२ डिसेंबर रोजी वाघिणीच्या C2 नामक मादी बछड्याला जेरबंद केलं.

मात्र दुसऱ्या दिवशी नर बछडा त्या भागातून निसटून गेला. हा नर बछडा १५३ कंपार्टमेंट असलेल्या भूलगड परिसरात वास्तव्यास आला, त्यामुळे ही मोहीम थांबली होती. आता अवनी वाघिणीचा नर C1 बछडा भूलगड परिसरात वास्तव्यास आहे.

C1 ला जेरबंद करण्यासाठी प्लॅन तयार

वन विभागाने त्या वाघाच्या बछड्याला जेरबंद करण्यासाठी कुठलंही तार-कुंपण न करता तिथे बकरी तसंच घोडे बेट्स म्हणून वन विभागाने ठेवले आहे. तो बछडा तिथेच येऊन त्या बेट्सची शिकार करुन जगत आहे. आता वन विभागाने लोखंडी पिंजऱ्याला झाडाचा पालापाचोळा आणि विविध झाडांच्या फांद्यांनी झाकून आच्छादन केलं आहे. त्याच पिंजाऱ्यात वन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी बसून तिथे नर बछड्याला विशिष्ट अंतरावरुन डार्ट करुन जेरबंद करणार आहेत.

या लोखंडी पिंजाऱ्यात कुणी मनुष्य लपून बसला आहे याचा सुगावा लागू नये म्हणून वन विभागाने त्याभागात मनुष्याचा वावर कमी केला आहे. तसंच वनविभाग सध्या त्या नर बछड्यावर कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवून आहे. हा प्लॅन A यशस्वी झाला नाही तर वन अधिकारी त्या ठिकाणी प्लॅन B नुसार काम करणार आहेत. प्लॅन B नुसार पिंजाऱ्याच्या शेजारी एखाद्या झाडावर बसून किंवा तिथे मचाण बांधून पशुवैद्यकीय अधिकारी थांबतील आणि तिथून त्या वाघिणीच्या बछड्याला बेशुद्ध करुन जाळीच्या साहाय्याने जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.वाघिणीच्या बछड्याला जेरबंद केल्यावर त्याला पेंच इथल्या रेस्क्यू सेंटरला पाठवलं जाईल, असं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

अवनीच्या मृत्यूनंतर पर्यावरणप्रेमी संतापले … घेतले आक्षेप

– वाघीणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्नही झाला नाही.

– तिच्या शरीरावरील ‘डार्ट’ हा मॅन्युअली लावल्यासारखा दिसतो.

– शिकार करताना कुणीही प्रशिक्षित वन्यजीव डॉक्टर सोबत नव्हता.

– वाघीणीला मारताना सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांची पायमल्ली झालीय.

– वाघीणीला गोळी मारणाऱ्या असगर अलीकडे परवाना नव्हता.

– शिकारीची जबाबदारी शफाहतवर असताना त्याच्या मुलाने गोळी का मारली ?