आडत व्यापार्‍याला चाकूचा धाक दाखवून 21 लाखांना लुटले

यवतमाळ : आडत व्यापार्‍याला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील २१ लाख रुपये जबरदस्तीने लुटून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना कळंब -राळेगाव मार्गावरील उमरी ते सावरगाव दरम्यान घडली आहे. दोन दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी व्यापार्‍याला लुटले.

याप्रकरणी रामदास वामन चौधरी (रा. दहेगाव, ता़ कळंब) यांनी कळंब पोलिसांकडे दिली आहे. रामदास चौधरी व त्यांचे सहकारी दिवसभर व्यापार करुन राळेगाव येथून दुचाकीने आपल्या दहेगाव येथे निघाले होते. रात्री पावणेनऊ वाजता ते दहेगावाजवळील भूताच्या नाल्याजवळ आले. त्याचवेळी दोन दुचाकींवरुन चौघे जण आले. त्यांनी तोंडाला काळे फडके बांधले होते. त्यांनी चौधरी यांना चाकूचा धाक दाखविला. त्यांच्या डोळ्यात तिखट टाकले. चाकूही पोटाला टोचला. त्यांच्याकडील २१ लाख रुपयांची रोकड घेऊन ते पसार झाले. या प्रकारामुळे अतिशय घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी व्यापारी व सहकार्‍यांना कळविले. त्यानंतर कळंब पोलीस ठाण्याकडे फिर्याद दिली आहे.