यवतमाळमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या, राज्यात 24 तासात दुसरी घटना

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतात देखील दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून महाराष्ट्रात याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यातच बारामतीनंतर यवतमाळ येथे एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यवतमाळ येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना शासकीय निवासस्थानी मंगळवारी (दि.12) रात्री आठच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, उमरखेड तालुक्यातील जेवली येथील संजय रतीराम साबळे हे काही दिवसांपासून पोलीस मुख्यालयात ड्युटीवर होते. त्यांची ड्युटी आता कोरोनाबाधित भागातील इंदिरानगर येथे होती. मंगळवारी ते पळसवाडी इथं असलेल्या पोलीस वसाहतीत परतले. तिथ राहत्या घरात त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. गेल्या काही दिवसांपासून संजय यांची पत्नी माहेरीच आहे. बाळंतपणासाठी पत्नी माहेरी गेल्याने ते घरी एकटेच रहात होते. संजय यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक नुरूल हसन हे घटनास्थळी पोहचले.

यापूर्वी बारामतीत एका पोलीस कॉन्स्टेबलनं आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. त्याला 24 तास होत नाहीत तोच यवतमाळ मध्ये दुसऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तुषार सानप असे बारामतीमध्ये आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव होते. ते बारामती शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते.