‘कोरोना’शी दोन हात करताना चिमुरड्यांसाठी ‘वायसीएम’ ठरले देवदूत, 100 दिवसांत 175 मुलांवर यशस्वी उपचार

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शहरात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना दुसरीकडे दिलासादायक असे चित्र पहायला मिळत आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण शहरात आढळून आल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने तातडीने दूरदृष्ट्री ठेवत यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) ‘बालरोग कोरोना वार्ड’ची सुरुवात केली. हा वार्ड कोरोनाची लागण झालेल्या चिमुरड्यांसाठी अक्षरश: देवदूत ठरत आहे. विशेष म्हणजे तज्ज्ञ, अनुभवी डॉक्टर, चांगल्या सुविधांमुळे एप्रिलपासून दाखल झालेले प्रत्येक कोरोनाबाधित बालक अगदी ठणठणीत होऊन घरी गेले आहे. अशा कोरोनाबाधित 175 बालकांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहे. कोरोनाबाधित शहरांपैकी ‘शून्य’ टक्के बाल मृत्यू असलेले पिंपरी चिंचवड राज्यात एकमेव आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातही मार्च महिन्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळला. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात ‘बालरोग कोरोना वार्ड’ची सुरुवात केली. हा वॉर्ड 26 एप्रिल 2020 रोजी सुरू झाला. एप्रिलमध्ये 13 कोरोना बाधित बालकांवर यशस्वी उपचार करून घरी सोडण्यात आले. त्यानंतर मे मध्ये 17, जून महिन्यात 102 तर जुलै मध्ये 43 बालकांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये वय वर्ष 1 ते 12 वर्षापर्यंतच्या बालकांचा समावेश होता .

बालरोग विभाग प्रमुख डॉ. दिपाली अंबिके यांनी याबाबत माहिती देताना सांगितले लागण झालेल्या या बालकांमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणं दिसत नव्हती मात्र कोरोना पॊझिटिव्ह आल्यामुळे शासनाने दिलेल्या सर्व अटी- शर्तींचे पालन करून त्यांच्यावर उपचार केले. एप्रिल मध्ये सुरवातीला बालकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आढळल्यानंतर 7 कोरोनाग्रस्त मुले बालरोग विभागात दाखल झाली होती. त्यामध्ये रूपीनगर निगडी मधील 5 मुलांचा तर भोसरीतील 2 समावेश होता. या मुलांवर वेळोवेळी सर्व उपचार देवून 14 दिवस रूग्णालयात ठेवण्यात आले होते. यापैकी दोन मुलांवर करोनाचे उपचार चालू असतांना त्यांच्या प्लेटलेट्सचे प्रमाण 30,000 व 66,000 असल्याचे प्रयोगशाळेतील अहवालावरून समोर आले होते. सशक्त मुलांमध्ये हे प्रमाण 1,50,000 च्या वर असते. त्यासाठी या मुलांवर उपचार करून सात दिवसात त्यांच्या प्लेटलेटस (पांढऱ्या पेशी) पूर्ववत करण्यात यश मिळाले.

डॉ. अंबिके यांनी सांगितले कि, बालरोग अतिदक्षता विभागात कोरोना बाधित बालकांना त्यांच्या आईसोबत ठेवण्यात आले होते. रुग्णालयात गेल्या 100 दिवसांमध्ये 175 मुलांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये एकही मूल दगावले नाही. लहान मुलांची प्रतिकारक्षमता आईच्या दुधामुळेच वाढते. त्यात मुल आईच्या सानिध्यात राहिल्यास इन्फेक्शन वाढण्याची भिती कमी असते. मूल दूर ठेवल्यास ते अस्वस्थ होते रडून रडून त्याची प्रतिकार क्षमता कमी होते. त्यामुळे दाखल झालेल्या 80 टक्के मुलांची आई त्यांच्यासोबत बालरोग विभागात होती. त्यामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोनाबाधित मुलांवर उपचार करण्यासोबत मातांवर ही कोरोना पॉझिटिव्ह समजूनच औषध उपचार करण्यात आले यातून मुले आणि माता दोघेही ठणठणीत होऊन घरी परतले. प्रत्येक आई आणि मुलांच्या 14 दिवसांच्या उपचारानंतर दोन वेळा घशातील द्रवाची तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दाखल झालेल्या मुलांमध्ये ताप, खोकला आणि सर्दी अशी लक्षणे होती. त्यामध्ये ताप असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक होते.

गेल्या तीन महिन्यात 16,12 आणि पाच दिवसांचे कोरोनाबाधित बालक दाखल झाले होते. नवजात शिशु विभागातून हि बालके दाखल झाल्यानंतर त्यापैकी दोघांना प्लेटलेट कमी होऊन एकाला संडासाच्या जागेतून रक्त जात असल्यामुळे अतिजोखम म्हणता येईल अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र चांगल्या आणि वेळीच उपचारांमुळे तिन्ही मुले अतिजोखमीच्या आजारातून बरे झाले आहे . बालरोग विभागातील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांच्या निगराणीत आता 10 कोरोनाबाधित मुले उपचार घेत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like