यंदा शिवाजी पार्क नव्हे तर ‘या’ ठिकाणी आयोजित होणार शिवसेनेचा दसरा मेळावा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या आयोजना संदर्भात अनिश्चितेचे वातावरण निर्माण झाले होते. पण आता शिवसेनेचा दसरा मेळावा होणार, हे निश्चित झाले आहे. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी वार्ताहरांना बोलताना याबाबत माहिती दिली आहे

संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेचा दसरा मेळावा होणार असून, कोरोनाचे संकट असल्याने अनेक नियमांचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे शिवाजी पार्क येथे या दसरा मेळाव्याचे आयोजन करता येणार नाही. पण या सोहळ्याला ऐतिहासिक सांस्कृतिक महत्व आहे. म्हणून दसरा मेळावा आयोजित होईल. मात्र, आम्ही नियम पाळतो. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा नियमांचे पालन करतात. त्यामुळे दसरा मेळाव्याचे आयोजन नियमांचे पालन करुन शिवाजी पार्कजवळ असलेल्या सावरकर स्मारक सभागृहात करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या अनुषंगाने राज्यात धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांना प्रतिबंध आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. त्यामुळे शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा होणार का नाही असा प्रश्न पडला होता. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर हा पहिलाच दसरा मेळावा आहे. म्हणूनच या मेळाव्याला खूप महत्व प्राप्त झाले आहे.

दसरा मेळावा शंभर लोकांत करा, नाहीतर….

केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाशिकमध्ये वार्ताहरांना बोलताना, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं शिवाजी पार्कवर फक्त शंभर लोकांच्या उपस्थितीत दसरा मेळावा साजरा करावा, नाहीतर शिवसेनेला कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला होता. तत्पूर्वी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुद्धपौर्णिमा, गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरे करण्यात आले. त्याचप्रमाणे शिवसेनेने शिवाजी पार्कवर शंभर लोकांच्या उपस्थितीत दसरा मेळावा साजरा करावा, अन्यथा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच शिवसेनेवर कारवाई करावी लागेल, असे आठवले म्हणाले होते.

You might also like