कर्नाटकामध्ये भाजपात बंडाचे वारे, येडीयुराप्पांच्या मागे लागलीय ‘रहस्यमयी’ CD

बंगळुरू : वृत्तसंस्था – काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) चे आमदार फोडून भाजपच्या येडीयुराप्पांनी दीड वर्षातच त्यांचे सरकार पाडले व पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यातच आता पुन्हा कर्नाटक मध्ये मंत्रिपद वाटपावरुन भाजपच्या आमदारांनी बंड पुकारल्याने येडीयुराप्पा यांची खुर्ची धोक्यात आली आहे.

कर्नाटक सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मागील आठवड्यात झाला. तेव्हा, पक्षाविरुद्ध उघड उघड नाराजी व्यक्त करणाऱ्या आमदारांना येडीयुराप्पांनी दिल्ली हायकमांकडे जाण्यास सांगितले. नवीन संधी देण्यात आलेल्या मंत्र्यांची नावे दिल्लीत ठरवण्यात आल्याचे सांगत एक मंत्रिपद रिक्त असल्याचे त्यांनी म्हटले. परंतु, त्यानंतर भाजपच्या आमदारांनी येडीयुराप्पांवर रहस्यमयी सीडीवरुन गंभीर आरोप करण्यास सुरुवात केल्याने कर्नाटकातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

“भारतीय जनता पार्टीचे नाव आता ब्लॅकमेल जनता पार्टी व्हायला हवे. ज्या आमदारांनी रहस्यमयी सीडीवरुन मुख्यमंत्र्यांना ब्लॅकमेल केलं त्यांना मंत्रीपदे देण्यात आल्याचा आरोप भाजपचेच आमदार करत असल्याचे,” काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.

काय आहे सीडी प्रकरण ?
२०१७ साली मुख्यमंत्र्यांचा खासगी सहाय्यक एन.आर संतोष यांनी ग्रामविकास मंत्री के. एस. ईश्वराप्पा यांचा पीए विनय यांच्या कथित अपहरणाचा प्रयत्न केला होता. विनयकडे एक अशी सीडी होती, त्याने कर्नाटकातील राजकारणात मोठा गौप्यस्फोट होऊ शकतो. ही सीडी संतोष यांना तोडायची होती. अपहरणाच्या गुन्ह्यात संतोष यांना जमीन सुद्धा मिळाला आहे. सध्या संतोष येडीयुराप्पांचे राजकीय पीए आहेत. नोव्हेंबर महिन्यात संतोष यांनी कथित रित्या आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तेव्हा पुन्हा एकदा सीडी प्रकरणाची चर्चा सुरु झाली होती. यावरती शिवकुमार म्हणाले होते की, मला सांगण्यात आले की संतोष यांच्या कथित आत्महत्येमागे ती सीडी आहे. तपास अधिकाऱ्यांनी याची चौकशी करावी.

भाजप आमदारांचे आरोप
मुख्यमंत्री येडीयुराप्पांना काही आमदार या सीडीवरून गेल्या काही महिन्यांपासून ब्लॅकमेल करत आहेत. त्यातील एकास राजनैतिक सचिव आणि दोघांना मंत्रिपद देण्यात आल्याचा आरोप भाजपचे आमदार बीपी यतनाल यांनी केला. त्यानंतर सीडी प्रकरण पुन्हा कर्नाटकात चर्चेत आले आहे.