येडीयुराप्पांनी भाजपच्या वरिष्ठांना दिली १८०० कोटींची लाच

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भजपचे नेते बी. एस. येडीयुराप्पा यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना हजारो कोटींची लाच दिल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. ज्या डायरीमध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. ती डायरी २०१७पासून आयकर विभागाच्या ताब्यात असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले नसल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज पत्रकार परिषद घेणार होते. मात्र, दिवसभरात दोनदा त्यांची पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली. शेवटी रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्रीय मंत्री आणि कर्नाटकातील भाजपाचे नेते येडीयुराप्पा यांच्यावर गंभीर आरोप केले.

येडीयुराप्पा यांना २०११ मध्ये खनिज घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात अटक झाली होती. यानंतर त्यांची २४ दिवसांनी सुटकाही झाली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. याप्रकरणी सीबीआयने टाकलेल्या छाप्यांत २०१७ मध्ये येडीयुराप्पांची डायरी जप्त केली होती. या डायरीमध्ये केंद्रातील मोठ्या नेत्यांना तब्बल १८०० कोटी रुपये लाच दिल्याचा उल्लेख केला आहे.

सुरजेवाला यांनी या डायरीचे झेरॉक्स माध्यमांना दाखविले. या पानावर केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आणि राजनाथ सिंह यांच्या नावाचा उल्लेख आहे. या पानावर सीबीआयने येडीयुराप्पांची सहीदेखिल घेतलेली आहे. यावरून सुरजेवाला यांनी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले असून येडीयुराप्पा मुख्यमंत्री असताना भाजपाच्या मोठ्या नेत्यांना हजारो कोटी रुपयांची लाच देण्यात आल्याचा आरोप केला आहे. मात्र, सत्तेत येताच भाजप आणि मोदी यांनी ही चौकशी थांबविल्याच्या आरोप केला आहे.

यावर भाजपाचे नेते बीएस येडीयुराप्पा यांनी काँग्रेसचे आरोप बिनबुडाचे असून ते मोदींच्या लोकप्रियतेमुळे निराश झाले आहेत. सुरु होण्याआधीच लढाई हरले आहेत. आयकर विभागाने ती कागदपत्रे खोटी असल्याचे आधीच जाहीर केले असल्याचे सांगत आरोप फेटाळले.