काही वेळातच ठरणार कर्नाटकातील येदियुरप्पा सरकारचे ‘भवितव्य’

बंगलुरु : पोलीसनामा ऑनलाइन  – कर्नाटकातील १५ विधानसभा जागांवरील पोटनिवडणुकीची मतमोजणी सोमवारी सकाळी ८ वाजता सुरु झाली असून काही वेळातच त्याचा निकाल स्पष्ट होणार आहे. या निकालावर मुख्यमंत्री येदियुरप्पा यांचे भविष्य निश्चित होणार आहे. कर्नाटकच्या २२३ सदस्यांच्या विधानसभेत बहुमत मिळविण्यासाठी या १५ जागांपैकी कमीत कमी ७ जागा भाजपाला जिंकाव्या लागणार आहेत.

भाजपाच्या सांगण्यावरुन जुलै महिन्यात काँग्रेस आणि जेडीएस यांच्या एकूण १७ आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे एच डी कुमारस्वामी यांचे सरकार पडले होते. तत्कालीन सभापतींनी या आमदारांना अयोग्य घोषित करुन त्यांना निवडणुक लढविण्यासही अपात्र ठरविले होते. सर्वोच्च न्यायालयाने सभापतींचा अयोग्य निर्णय कायम करीत त्यांना निवडणुक लढविण्यास मुभा दिली होती.

सध्या भाजपाकडे १०५ जागा असून त्यांना बहुमतासाठी ७ जागा मिळविणे आवश्यक आहे. सात पेक्षा कमी जागा मिळाल्या तर येदियुरप्पा सरकार अल्पमतात येणार आहे. मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा यांनी आपला पक्ष १३ जागा जिंकेल असा दावा केला आहे. काही तासात या १५ जागांचा निकाल लागणार असून त्यानंतर येदियुरप्पा राहणार की जाणार हे स्पष्ट होणार आहे.

Visit : Policenama.com