Coronavirus : अभिनेते सचिन त्यागी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जवळपास तीन महिने चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग थांबले होते. पण टाळेबंदी शिथिलतेनंतर काही नियम अटींचे पालन करुन शूटिंगला परवानगी देण्यात आली आहे. जरी शूटिंगला सुरुवात झाली असली तरी सुद्धा कोरोनाचे संकट अद्यापही घोंगावत आहे. आता ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील अभिनेते सचिन त्यागी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे मालिकेचे शूटिंग आता थांबवण्यात आलं आहे.

स्पॉटबॉय वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेचे शूटिंग सोमवारी सकाळी दहा वाजता फिल्मसिटी येथे होत होती. तेव्हा सचिन त्यागी यांचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आल्याचं समजलं. सचिन त्यागी मालिकेत कार्तिकचे वडील मनीष गोयंकाच्या भूमिकेत आहे.

तसेच सचिन सह त्यांच्या काही क्रू मेंबर्सचा चाचणी अहवाल देखील कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सचिन यांना ताप होता म्हणून त्यांनी आपली कोरोना चाचणी केली असता अहवाल सकारात्मक आला. त्याशिवाय मेंबर्समध्येही लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनीही आपली चाचणी केली. त्यातील काही जणांना कोरोनाची बाधा झाली तर काही जणांचा अहवाल नकारात्मक आला आहे.

दरम्यान, यापूर्वी सुद्धा कसौटी जिंदगी की आणि भाकरवडी मालिकेचं शुटिंगही कोरोनामुळे थांबवण्यात आलं होत. कसौटी जिंदगीकीतील मुख्य अभिनेता पार्थ समथानला मालिकेचं शुटिंग सुरु झाल्यावर काही दिवसातच कोरोनाची लागण झालेली. तर भाकरवडी मालिकेच्या क्रू मेंबरचा मागील महिन्यातच कोरोनाने मृत्यू झाला होता.