नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – Yeola Assembly Election 2024 | येवला विधानसभा मतदारसंघात प्रचार सभेत बोलताना शरद पवार यांनी छगन भुजबळ आणि अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. आजची सभा ऐतिहासिक सभा आहे, माणिकराव शिंदें यांनी लोकांची सेवा केली आहे. मागे मी आलो असता, मी जाहीर सांगितले होते की आमच्याकडून चूक झाली असे म्हणत शरद पवारांनी येवलेकरांना साद घातली. (Sharad Pawar On Chhagan Bhujbal)
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या विधानसभा, विधानपरिषदेत संधी दिली, विरोधी पक्षनेते पद दिले. पण, त्यांनी काही उद्योग केले, त्यांना पद सोडवं लागलं, तुरुंगात गेले, त्यांना भेटायला कोणी जात नव्हते. माझी मुलगी, आम्ही त्यांना भेटायला गेलो, त्यांना पुन्हा संधी दिली, तुम्ही त्यांना निवडून दिले.
मुंबईतील शिवाजी पार्कवर संमेलन घेतले होते, त्याचे अध्यक्षपद भुजबळ यांना दिले. उपमुख्यमंत्री पद दिले, त्यानंतर ते आणखी उद्योग करत होते, त्याचा परिणाम सरकारवर झाल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले, ” आमच्या सहकाऱ्याने पक्ष फोडला, तेव्हा भुजबळ सकाळी आले, जे झालं ते वाईट झालं, समजूत काढायला जाऊ का असं मला विचारलं. भुजबळ साहेब गेले ते परत आलेच नाही, आणि दुसऱ्या दिवशी शपथच घेतली.
एखाद्या माणसानं चुकीचे काम करताना काही मर्यादा असतात, त्या भुजबळ यांनी शिल्लक ठेवल्या नाहीत, अशा लोकांना पुन्हा निवडुन द्यायचं नाही हा विचार तुम्ही करायचा आहे. ही लढाई आपण प्रचंड मतांनी जिंकू”, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.