चोरट्यांना लुबडणार्‍या २ बीट मार्शलला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – घरफोडी करून मिळालेल्या ऐवजाच्या वाटणीवरून भांडणार्‍या दोन चोरटयांना पोलिस चौकीत नेवुन त्यांच्याकडील 2 लाख 99 हजार 500 रूपयाचा ऐवज स्वतःजवळ ठेवुन त्यांना स्वतःचा मोबाईल नंबर एका कागदावर लिहून देणार्‍या पुण्यातील दोन बीट मार्शलला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. यापुर्वीच त्या दोन्ही बीट मार्शलला निलंबीत करण्यात आले होते.

पोलिस कर्मचारी नितीन फकीर शिंदे (बक्‍कल नं. 8957) आणि पोलिस कर्मचारी आकाश बलदेश सिमरे (बक्‍कल नं. 8557) अशी अटक करण्यात आलेल्या बीट मार्शलची नावे आहेत. ते दोघेही कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात कार्यरत होते. दि. 2 फेबु्रवारी रोजी शिंदे आणि सिमरे यांना रात्रपाळी होती. ते रूबी हॉस्पीटलजवळुन जात होते. त्या दरम्यान येरवडा परिसरातील एका घरात घरफोडी करून वाटणीवरून शाहरूख सलीम शेख (19, रा. राजीव गांधी नगर, येरवडा) आणि त्याचा एक अल्पवयीन साथीदार रूबी हॉस्पीटल समोर भांडण करीत होता. शिंदे आणि सिमरे यांनी चोरटयांना मंगलदास चौकीत नेले.

पोलिसांनी चोरटयांकडील सोन्याच्या बांगडया आणि इतर ऐवज स्वतःजवळ ठेवुन घेतला. पोलिसांनी एका चिठ्ठीवर त्यांचे नाव प्रिन्स साहेब असे लिहून देवुन स्वतःचा मोबाईल नंबर त्यांना लिहून दिला. तुम्हाला कोणी काही त्रास दिला तर फोन करा असे पोलिसांनी चोरटयांना सांगितले. दरम्यान, येरवडा पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक रविंद्र गवारी हे परिसरातील एका घरफोडीच्या गुन्हयाचा तपास करीत होते. त्यांनी संशयावरून आरोपी शाहरूख सलीम शेख आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला दि. 7 फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी घरफोडीची कबुली दिली. चोरटयांनी त्यांच्यासोबत दि. 2 फेबु्रवारी रोजी रात्री घडलेल्या घटनेची माहिती पोलिस उपनिरीक्षक रविंद्र गवारी यांना दिली. उपनिरीक्षक गवारी यांनी दोन बीट मार्शलांनी चोरटयांकडील ऐवज घेतल्याबाबतचे वरिष्ठांना सांगितले.

प्रकरणाच्या तपासासाठी बीट मार्शल नितीन शिंदे आणि आकाश सिमरे यांना येरवडा पोलिस ठाण्यात बोलाविण्यात आले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता शिंदे आणि सिमरे त्यांनी घरफोडीतील आरोपींकडून सोन्याच्या बांगडया आणि इतर ऐवज घेतल्याचे कबुल केले. त्यानंतर दोन दिवसांनी शिंदे आणि सिमरे यांनी दागिने वितळवुन 27 ग्रॅम सोने पोलिसांनी दिले. दरम्यान, गुन्हयाच्या तपासाअंती पोलिस कर्मचारी शिंदे आणि सिमरे यांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे.