कैद्यांचे लाड पुरविणं ‘त्या’ कारागृह रक्षकाला पडलं महागात ; डब्यात गांजा लपवून नेताना रंगेहात अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – डब्यात गांजा लपवून येरवडा कारागृहात नेण्याचा प्रयत्न करणार्‍या एका कारागृह रक्षकाला पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याकडून २०० ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान तो गांजा कैद्यांना देण्यासाठी नेत असल्याचे निदर्शनास आले आहे. कारागृहातील कैद्यांचे लाड पुरविणाऱ्या या कारागृह रक्षकाला येरवडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

विकी वसावे (वय २८, रा. कारागृह वसाहत, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

वसावे हा येरवडा कारागृहात रक्षकाचे काम करतो. वसावे रविवारी रात्र पाळीच्या कामासाठी येरवडा कारागृहात गेला. दरम्यान कारागृहात येणार्‍या रक्षकांची नियमित तपासणी करण्यात येते. त्यावेळी वसावेच्या पिशवीतील डब्याचीही तपासणी केली गेली. तेव्हा डब्यात प्लास्टिकच्या पिशवीत तंबाखू ठेवल्याचे आढळून आले. कारागृहातील अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी याची चौकशी केली. त्यावेळी पिशवीत गांजा असल्याचे उघडकीस आले. कारागृहातील अधिकाऱ्यांनी पिशवीतील २०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. तसेच याची माहिती पोलिसांना दिली.

वसावे याला अटक करण्यात आली आहे. वसावे कारागृहातील कैद्याांना गांजा पोहचवित असल्याचा संशय कारागृहातील कारागृह प्रशासनाकडून चौकशी करण्यात येत आहे. वसावेच्या पिशवीतून दोन हाफ पॅण्ट जप्त करण्यात आल्या आहेत. या पॅन्ट त्याने कैद्याांना देण्यासाठी नेल्याचा संशय आहे, असे येरवडा पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक अजय वाघमारे यांनी सांगितले.