आगामी 3 दिवसांत YES बँकेवरील निर्बंध हटणार, अधिसूचना जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने ५ मार्च पासून येस बँकेवर निर्बंध घातले आहेत. भांडवल उभे करता न आल्यामुळे आणि कर्जबाजारी झाल्यामुळे आरबीआयने हे निर्बंध लादले होते. या निर्बंधांमुळे बँकेच्या ग्राहकांना आपल्या खात्यातून महिन्याला केवळ ५० हजार रुपयेच काढता येणार होते. याचा परिणाम शेअर बाजारावरही झाला होता. परंतु, येस बँकेमध्ये ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ ने रुची दर्शविली आहे, म्हणून केंद्रीय अर्थ मंत्रालयाने येस बँकेवरील निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय काळ रात्री उशिरा घेण्यात आला. या अधिसूचनेनुसार तीन दिवसांत बँकेवरील निर्बंध उठणार असून, स्टेट बँकेच्या दोन संचालकांना सात दिवसांच्या आतमध्ये येस बँकेच्या संचालक मंडळावर घ्यावे लागणार आहे.

येस बँकेवरील निर्बंधामुळे देशात खळबळ माजली होती. त्यामुळे एसबीआयला येस बँकेत गुंतवणूक करायला सांगण्यात आले. येस बँकेतील ग्राहकांचे पैसे सुरक्षित असल्याची हमी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली होती. येस बँकेच्या प्रशासक पदावर एसबीआयचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी प्रशांत कुमार यांची नेमणूक केलेली होती. येस बँकेचे संचालक राणा कपूर यांना देखील ईडीने ताब्यात घेतले आहे व संचालक मंडळाला ३० दिवसांसाठी निलंबित केले आहे.

येस बँकेेचे संचालक राणा कपूरच बँकेला संकटाततून बाहेर काढण्याचा प्लॅन अपयशी करत असल्याचा संशय आरबीआय आणि केंद्र सरकारला आला आणि त्यांनी सापळा रचून राणा कपूरला त्याच्याच खेळीत अडकवले, अशी माहिती एनबीटी वृत्तसंस्थेकडून मिळाली आहे. गेल्या ८ महिन्यांमध्ये येस बँकेत गुतंवणूकीचा करार फायनल होत आला होता पण, संभाव्य गुंतवणूकदारानी शेवटच्या क्षणी माघार घेतली त्यामुळे आरबीआयला काही समजत नव्हते म्हणून, ही चाल आरबीआय आणि केंद्र सरकारने खेळली असे म्हटले जात आहे.