Yes Bank Scam : वाधवानांच्या बंगल्याची CBI कडून झाडाझडती

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – येस बँक आर्थिक घोटाळ्यातील वाधवान बंधू सीबीआयच्या कोठडीत आहेत. त्यांना तपासासाठी बुधवारी (दि.6) महाबळेश्वरमध्ये आणण्यात आले होते. यावेळी सीबीआयच्या विशेष तपास पथकाने वाधवान यांच्या बंगल्याची झाडाझडती घेतली. जवळपास पाच तास तपास केल्यानंतर सायंकाळी वाधवान बंधूंना सोबत घेऊन हे पथक पुन्हा मुंबईकडे रवाना झाले.

धीरज वाधवान आणि कपील वाधवान यांच्यावर येस बँकेतील आर्थिक घोटाळ्याचा आरोप आहे. सीबीआयच्या पथकाने वाधवान बंधूंना 23 एप्रिल रोजी महाबळेश्वर येथील बंगल्यातून ताब्यात घेतले होते. तेव्हापासून ते सीबीआयच्या कोठडीत आहेत. तर 7 मे पर्यंत त्यांना कोठडी सुनावण्यात आलेली आहे. दरम्यान, बुधवारी सीबीआयचे विशेष तपास पथक वाधवान बंधूंना घेऊन महाबळेश्वर येथील त्यांच्या बंगल्यावर आले. सीबीआयच्या दोन विशेष वाहनातून त्यांना दुपारी महाबळेश्वर येथे आणण्यात आले होते. यापूर्वी त्यांना महाबळेश्वर येथे आणण्यात येत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली होती.
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार दुपारी बारा वाजता स्थानिक पोलिसांचे पथक वेण्णालेक येथे आले. तेथून सीबीआयच्या पथकाबरोबर सर्वजण वाधवान हाऊस येथे गेले.

या ठिकाणी स्थानिक पोलिसांना बाहेर थांबवून सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाकेच पोलीस निरीक्षक व त्यांच्या पथकाने पाच तास तपास केला. यावेळी बंगल्याची झाडाझडती घेत कागदपत्रांची पाहणी केली. तसेच याप्रकरणी पुन्हा दोन्ही बंधूंचे जबाब नोदवण्यात आले. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता सीबीआयचे पथक मुंबईकडे रवाना झाले.