YES Bank घोटाळा प्रकरणात ED ची मोठी कारवाई, राणा कपूरची 2200 कोटींची संपत्ती जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  येस बँक घोटाळा प्रकरणात राणा कपूरवर सक्तवसुली संचालनालयने मोठी कारवाई केली आहे. ईडीने येस बँकचे सहसंस्थापक आणि घोटाळा प्रकरणात आरोपी असलेल्या राणा कपूर यांच्या मोठी कारवाई करत 2200 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. ईडीने राणा कपूरसह त्यांच्या कुटुंबियांची देखील मालमत्ता जप्त केली आहे. डीएचएफएलचे प्रमोटर कपिल आणि धीरज वाधवान यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. त्यांच्या संपत्तीवरही टाच येणार आहे.
दुसऱ्या एका आर्थिक घोटाळा प्रकरणात वाधवान बंधू आधीच सीबीआयच्या ताब्यात आहेत. त्याची चौकशी आहे. दरम्यान, येस बँकेच्या राणा कपूरच्या मालकीची मुंबई, पुण्यासह अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि यूकेमध्ये असणारी मालमत्ता जप्त होणार आहे. यामध्ये मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीत पेडर रोडवर 6 प्रशस्त फ्लॅट्स आणि मलबार हिलचा अलिशान बंगला याचा समावेश आहे. लंडनमध्येही राणा कपूर यांची मोठी संपत्ती असून त्यावरही टाच आली आहे.

राणा कपूर आणि त्यांच्या दोन मुलींची डमी कंपनी अर्बन बँक व्हेंन्चर्स या घोटाळ्यामधू 600 कोटी रुपये मिळाले होते. याचीही ईडीकडून चौकशी करत आहे. तीस हजार कोटीहून अधिक रक्कम कर्ज म्हणून बेकायदेशीरपणे मंजूर केल्याचा राणा कपूर याच्यावर आरोप आहे. 2004 मध्ये त्यांनी येस बँक स्थापन केली आमि 2019 पर्यंत ते बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ होते. याच काळात कोट्यावधी रुपयांची अफरातफर झाली आहे. येस बँकेने डीएचएफएलला 3750 कोटी रुपये आणि डीएचएफएलच्या नियंत्रणाखाली असलेल्या आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सना 750 कोटी रुपयांचे कर्ज दिलं होतं.