‘हवं तर तुम्हाला साष्टांग दंडवत घालतो, पण यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने करा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शतकोनशतके चालत आलेली पंढरीची वारी खंडीत करून, यावर्षी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्या पादुका थेट पंढरपूरला नेण्यात आल्या. अशावेळी पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी देखील सामंजस्याची भूमिका घेऊन यांदाच्या वर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने आणि गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना मंडपात न करता आहे त्या मंदिरातच करावी, असे आवाहन पुणे पोलिसांनी गणेश मंडळांना केले आहे.
गणेशोत्सवानिमित्त पुणे महापालिकेकडून गणेश मंडळाची आढावा बैठक आयोजित केली होती. त्यावेळी पोलीस प्रशासनाकडून हे आवाहन करण्यात आले.

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीला पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार तसेच इतर पदाधिकारी व अधिकारी आणि गणेश मंडळांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांनी, शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव दरवर्षीप्रमाणे उत्साहात व परंपरेनुसार साजरा केला जाणार असला तरी यंदाच्या उत्सवावर कोरोना विषाणूचे सावट असल्याने मंडळांना कोणत्याही प्रकारच्या देखाव्यांना परवानगी दिली जाणार नाही.

दरम्यान, कोरोना संकटादरम्यान गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करून उत्सव साधेपणाने साजरा करावा. कोरोना पार्श्वभूमीवर उभारण्यात येणाऱ्या जम्बो हॉस्पिटलच्या उभारणीस हातभार लावावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पुणे शहरातील बहुसंख्य सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्रींच्या मूर्ती या वर्षभर मंदिरामध्येच असतात. त्यामुळे कोरोना आपत्तीत यावर्षी गणेश मंडळांनी मंडप टाकण्याऐवजी मंदिरामध्येच मूर्तीची स्थापना करावी व दहा दिवसांनी तेथेच पुजेच्या मूर्तीचे विसर्जन करावे असे आवाहन यावेळी पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी केले आहे. मानाच्या मंजळांनीही याकरिता पुढाकार घ्यावा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

कोणत्याही स्वरुपाची मिरवणुक काढू नका – महापौर
शहरामध्ये आपण दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करतो. मात्र, यंदाच्यावर्षी कोरोना संकटाचा सामना करत आहोत. कोरोना नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे. हे लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा. गणेश मंडळांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे. तसेच कोणत्याही स्वरुपाच्या मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. भाविकांना डिजिटल पद्धतीच्या माध्यमातून दर्शनाची व्यवस्था करावी, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like