100 हा हेल्पलाईन क्रमांक लवकरच इतिहासजमा होणार !

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन – देशभरातील 20 राज्यामध्ये 100 क्रमांक ( police-helpline-number) हा आपत्तकालीन प्रसंगात पोलिसांशी संपर्क करण्यासाठी वापरला जातो. त्यात गुजरात व महाराष्ट्र या राज्यांचा देखील समावेश आहे. गेल्या अनेक वर्षापासून पीडीतांच्या सेवेत असणारा 100 क्रमांक ( 100-will-be-closed-soon) आता लवकरच इतिहास जमा होणार आहे. त्याऐवजी 112 हा नवीन व एकच क्रमांक आपत्कालीन प्रसंगी पीडीतांच्या सर्व प्रकारच्या मदतीला उपलब्ध करून दिला जाणार आहे. डिसेंबर अखेपर्यंत राज्यात 112 हा एकच क्रमांक सर्व प्रकारची मदत मिळण्यासाठी उपलब्ध होणार आहे. 112 या क्रमांकाद्वारे सर्व प्रकारची मदत संकटकाळात मिळावी, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या राज्यात पोलीस 100 क्रमांक, अग्नीशमन दल 101, महिला हेल्पलाईनसाठी 1090 हे क्रमांक वापरण्यात येत होते. परंतू लवकरच हे क्रमांक इतिहास जमा होणार आहेत. त्याऐवजी 112 हा एकच क्रमांक उपलब्ध असणार आहे. देशातील 20 राज्यासह केंद्रशासित प्रदेशांनी हा क्रमांक स्विकारल्याची माहिती आहे. यात गतवर्षी उत्तपप्रदेश सरकारने 100 क्रमांका ऐवजी 112 क्रमांकाचा वापर हेल्पलाईन म्हणून सुरु केला होता. त्यानंतर महाराष्ट्रात सुध्दा या क्रमांकाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरु आहेत. डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत 112 हा हेल्पलाईन क्रमांक म्हणून राज्यात अस्तित्वात आणला जावा या दृष्टीने तयारी सुरु असल्याची माहिती अप्पर पोलीस महासंचालक नोडल ऑफिसर सेंटलाईज हेल्पलाईन सिस्टमचे एस. जगन्नाथ यांनी दिली आहे.

आपत्कालीन प्रसंगी जर कुणी 112 क्रमांकावरून संपर्क साधल्यास तात्काळ आणि एकाच वेळी पोलीस नियंत्रण दल, अग्नीशमन दल, महिला हेल्पलाईन यांना संबधित क्रमांकाची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. याबाबत लवकरच सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्यात असलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातून यासंबधी प्रशिक्षण दिले जाणार आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर देशपातळीवर एक मदत क्रमांक असावा, या चर्चेने जोर धरला होता. त्यानंतर सुप्रिम कोर्टानेदेखील त्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्याचाच आधार घेऊन आपत्कालीन प्रतिसाद सहाय्य प्रणाली निर्मितीचा निर्णय घेण्यात आला आहे.

You might also like