‘हो, आम्ही शिवसेनेला फसवलं’, भाजपच्या दिग्गज नेत्याची ‘कबुली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून शिवसेना-भाजप युती संपुष्टात आली. यानंतर दोन्ही पक्षाने एकमेकांवर फसवणुकीचा आरोप केला. मात्र, भाजपने शिवसेनेला फसवल्याची कबुली भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत दिली. आम्ही शिवसेनेला फसवले, पण आमच्या चुकीचा तुम्ही एवढा मोठा फायदा उचलला. कधी न कधी आम्ही ही चूक सुधारू असे धक्कादायक विधान सुधीर मुनगुंटीवार यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणुकीत युती करताना मातोश्रीवर उद्धव ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या युतीबाबत आणि मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा झाली होती. तीन नेत्यांमध्ये झालेल्या या चर्चेनंतर मुख्यमंत्रीपदावरून भाजप-शिवसेनेने दावे प्रतिदावे केले. मुख्यमंत्रीपद अडीच वर्षे देण्याचा शब्द भाजप नेत्यांनी दिल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी करत भाजप खोटं बोलत असल्याचे विधान वारंवार केले.

तर मुख्यमंत्रीपद अडीच वर्षे देण्याचा शब्द दिला नसल्याचे विधान देवेंद्र फडणवीस यांनी करत शिवसेनेला खोटं पाडलं होतं. त्यामुळे नक्की खोटं कोण आणि खरं कोण हा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, आम्ही शिवसेनेला फसवल्याची कबुली सुधीर मुनगुंटीवार यांनी विधानसभेत दिली. त्यापुढे जाऊन ते म्हणाले की, मध्य प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रातही एखादा ज्योतिरादित्य शिंदे तयार होईल, असा इशारा त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like