पुण्यात पुन्हा एकदा मांजा गळ्याला लागून अपघात ; पिता-पुत्र जखमी 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – काही महिन्यांपूर्वी पुण्यात पतंगाचा मांजा कापून सुवर्णा  मुजुमदार या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती आता पुन्हा एकदा पुण्यातील वडगाव शेरी येथे राहणारे  वकील आणि त्यांच्या आठ वर्षाच्या मुलगा मांजामुळे जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , वकील महेश गोगावले आणि त्यांचा आठ वर्षांचा मुलगा ऋग्वेद फिनिक्स मॉल वरून त्यांच्या घरी वडगाव शेरी येथे जात होते. ते दुचाकीवरून  जात असताना त्यांच्या गळयाभोवती नॉयलॉन चा मांजा गुंडाळला गेला. वाहन चालू असताना ही घटना घडल्यामुळे त्यांच्या गाडीला तर अपघात घडलाच पण मागून येणारी स्कुटर देखील त्यांना धडकली.हा अपघात रामचंद्र  सभागृहाच्या पुढे सोमनाथ नगर रोडवर घडला . गोगावले यांनी दिलेल्या माहितीनुसार हा मांजा झाडावर अडकला होता. रस्त्यावरून जात असताना हा नॉयलॉनचा मांजा दृष्टीस पडला नाही.

दरम्यान या घटनेत गोगावले यांच्या गळ्याला मांजा कापला आहे तर त्यांचा आठ वर्षांचा मुलगा ऋग्वेद देखील या घटनेत किरकोळ  जखमी झाला आहे. या अपघातानंतर त्यांना लगेचच वडगाव शेरी यथील सिटी केअर रुग्नालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यवर उपचार केले असून सध्या त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे. त्यांना घरी पाठवले आहे तसेच तीन दिवस आराम करायला सांगितले आहे.

पक्षांचाही जीव जातोय 

उडणाऱ्या पक्ष्यांना चायनीज नायलॉन मांजाचा स्पर्श झाल्यास दुखापत, अपंगत्व येते. तसेच काहीवेळा त्यांचा जीवही गेल्याच्या घटना घडल्या आहेत. पक्षी अशा मांज्यात अडकल्यास त्याची सहजासहजी सुटका होत नाही.

नॉयलॉनचा मांजा घातकच

शहरीकरणामुळे मैदाने, मोकळ्या जागा न उरल्यामुळे घर व इमारतींच्या छतांवरून पतंग उडविण्यास सुरवात झाली. ‘एनजीटी’ने बंदी घालूनही आदेशाची अंमलबजावणी गांभीर्याने केली जात नाही. त्यामुळे पशू-पक्ष्यांसह लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा यात नाहक जीव जात आहे तसेच जखमींची संख्या जास्त आहे. सरस किंवा खळामध्ये काचेचे लेपण लावलेल्या नायलॉन व तंगुस मांजामुळे सर्वाधिक मृत्यू गुजरातमध्येच झाले आहेत. त्यानंतर मांजामुळे इजा होऊन तसेच पतंग पकडण्याच्या नादात अपघात होऊन मध्य प्रदेश व महाराष्ट्रामध्ये पशू-पक्षी व मनुष्यहानी झाली आहे. मांजामुळे गंभीर जखमी होऊनही बचावलेल्यांना कान, नाक व डोळे गमवावे लागले आहेत. दरम्यान या मांजावर बंदी असताना देखील हा मांजा वापरला जातो.