कंबरदुखीपासून सुटका हवीय ? करा ‘हे’ सोपं आसन

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  शरीराला आकार आणि आधार देण्याचं महत्त्वाचं काम हाडं करत असतात. कमरेच्या गोलाकार हाडांचे(पेल्व्हिसचे) कार्यही शरीराला आधार देणं हेच आहे. जिथे भक्कम आधार असतो तिथं हालचाल कमी असते. पेल्व्हिसमध्ये 3 हाडं डोक्याच्या कवटीत एकमेकांत घट्ट बसलेली असतात. म्हणून तिथं हालचाल नाही. परंतु अतिशय लवचिक असणारा पाठीचा कणा हा पेल्व्हिसच्या मागच्या बाजूनं जोडलेला आहे. त्यामुळं कमरेपासून पुढं वाकणं, मागे झुकणं, पाय पोटाशी घेणं अशा पद्धतीनं फॉरवर्ड आणि बॅकवर्ड बेंड घडू शकतात.

आपल्या कमरेचे 5 मणके पुढे जाऊन तळहाताएवढ्या त्रिकास्थीमध्ये परावर्तीत होतात. ते मागच्या बाजूनं पेल्व्हिसची मजबूत भिंत तयार करतात. म्हणून शरीराचं वजन कमरेपशी पुढच्या आणि मागच्या भागात विभागले जाते.

ज्या ठिकाणी पेल्व्हिस आणि सॅक्रम जोडले जातात त्याला एस आय जॉईंट म्हणतात. साध्या भाषेत सांगायचं झालं तर पाठीच्या तळाशी त्वचेवर 2 खड्डे असतात. त्यांना पेल्व्हिक डिंपल म्हणतात. हा भाग म्हणजे एस आय जॉईंटच्या सर्वात वरचा भाग आहे. इथं सगळ्यात जास्त हालचाल घडत असते. अनेकदा कंबरदुखी असेल आणि खड्ड्यांवर दाब दिला तर ते दुखतात. बसलेल्या स्थितीत असताना कमेरवर सर्वात जास्त दाब येतो. हळूहळू स्थिर असणाऱ्या सॅक्रम आणि कमरेच्या मणक्यातील अँगल बिघडतो. येथून निघणाऱ्या नर्व्ह आणि डिस्कवरचा दाब वाढतो. परिणामी, स्लिप डिस्क होते आणि कंबरदुखी सुरू होते.

अनेकदा आपण आराम मिळावा यासाठी पाठीवर सरळ झोपल्यानंतर देखील हा भाग मोकळा होत नाही आणि आरामही मिळत नाही. अशात जर आपण पाय दुमडून पाठीवर झोपलो तर कमरेवरील दाब कमी होतो. इतकंच नाही तर जर आपण विशिष्ठ अंशात पाय वर उचलले तर जॉईंटवरचा दाबही मोकळा होतो आणि कंबरदुखीत आराम मिळतो.

कंबरदुखीपासून आराम मिळवण्यासाठी आज आपण असा एक सोपा प्रकार पाहणार आहोत. या आसनाचं नाव आहे उत्थितपादासन. यासाठी पुढीलप्रमाणे क्रिया करा.

– पाठीवर सरळ झोपा. कंबर दुखत असेल तर एक पाय गुडघ्यात दुमडून पाऊल जमिनीवर टेकवा.

– दुसरा पाय जमिनीपासून हळूहळू वर उचला. आपल्या डोळ्यांना पायाचा अंगठा दिसेल इतकाच पाय वर उचलायचा आहे. ( या स्थितीत पाय जमिनीपासून साधारण एक वित वर येतो.) या स्थितीत 10 अंक मोजेपर्यंत होल्ड करणे.

– हळूहळू 45 अंशात पाय वर उचलायचा आहे. या स्थितीत 30 सेकंदासाठी पाय वर ठेवा. ही क्रिया तीनदा करा. एकेका पायानं दिवसातून 2 वेळा हा व्यायामप्रकार करा. कंबरदुखीपासून तुम्हाला आराम मिळेल.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.