केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी बाबा रामदेव यांना सुनावलं, म्हणाले – ‘तुम्ही ‘ते’ विधान जाहीरपणे मागे घ्या, फक्त स्पष्टीकरण देऊन चालणार नाही’

पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. असे असतानाच योगगुरु बाबा रामदेव यांनी कोरोनावरील उपचारासंबधी अविश्वासर्हता दर्शवली होती. ॲलोपॅथी ही मूर्ख अन् लंगडे विज्ञान आहे. सर्वप्रथम हायड्रोक्लोरोक्वीन फेल ठरले. त्यानंतर प्लाझ्मा थेरपी अन् रेमडेसीवीर इंजेक्शनही फेल ठरल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटले होते. यावरून इंडियन मेडिकल असोसिएशनने संताप व्यक्त बाबा रामदेव यांच्यावर गुन्हा दाखल करावा,अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली होती. आता डॉ. हर्षवर्धन यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. बाबा रामदेव यांनी उपचारांसंबंधी केलेल विधान म्हणजे कोरोना योद्धांच्या भावनांना ठेच पोहोचवणार आहे. यासंदर्भात फक्त स्पष्टीकरण देऊन चालणार नाही. बाबा रामदेव यांनी आपल विधान जाहीरपणे मागे घ्यावे, असे डॉ. हर्षवर्धन यांनी बाबा रामदेव यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, ॲलोपॅथी उपचारांबाबत आणि डॉक्टरांबद्दलच्या विधानावरुन देशातील नागरिकांच्या भावना खूप दुखावल्या आहेत. जनतेच्या या भावनांबाबत मी तुम्हाला फोनवरही कल्पना दिली आहे. शनिवारी तुम्ही जे स्पष्टीकरण म्हणून पत्रक जारी केले ते झालेल्या जखमांवर मलमपट्टी लावण्यासाठी पुरेस नाही. ॲलोपॅथी औषधांमुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचे तुमचे विधान अतिशय दुर्दैवी आहे.

आज लाखो लोक ॲलोपॅथीमुळेच कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. आज देशात कोरोनाचा मृत्यूदर फक्त 1.13 टक्के आणि बरे होण्याचे प्रमाण 88 टक्के इतके आहे. यामागे ॲलोपॅथी आणि डॉक्टरांचे सर्वात मोठ योगदान आहे. उपचारांच्या सध्याच्या प्रक्रियेला तमाशा संबोधन ॲलोपथी उपचारांचीच नव्हे, तर डॉक्टरांच्या आत्मविश्वासाला ठेच पोहोचविण्यासारखे आहे. तुम्ही दिलेल्या स्पष्टीकरणावर मी अजिबात संतुष्ट नसल्याचे रोखठोक मत डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केले आहे. कोरोनाविरोधातील लढाई सामूहिकरित्याच लढता येईल याचे भान प्रत्येकाने बाळगायला हवे असे हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.