विद्यार्थ्यांनी ‘तंदुरुस्त’ राहण्यासाठी करावीत ‘ही’ आसने

पोलीसनामा ऑनलाइन टीम – निरोगी राहण्यासाठी योगासने महत्त्वाची असतात. काही योगासनांमुळे मानसिक ताणच दूर होतो, शिवाय एकाग्रताही वाढते. योगासने केल्यामुळे विद्यार्थी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहतात. शालेय आणि कॉलेज जीवनापासून अशाप्रकारे योगासनांची सवय असल्यास मोठेपणीही त्याचा निश्चित फायदा होतो. यासाठी मुलांनी योगासने आवर्जून केली पाहिजेत.
एकपादासन केल्याने शरीर निरोगी राहते. यामुळे आळस दूर होतो आणि शरीर तरतरीत बनते. रागावर नियंत्रण करण्यासाठीही एकपादासन लाभदायक आहे. हे आसन करण्यासाठी ताठ कण्याने उभे राहा. डाव्या तळपायावर भार देत उजवा गुडघा वाकवून उजवा तळपाय डाव्या मांडीला आतून लावावा. जेणेकरून उजवी जांघ डाव्या जांघेमध्ये येईल. दोन्ही हात नमस्कार स्थितीत डोक्यावर दंडकानाला चिकटून आणि दृष्टी सरळ ठेवावी. हात नमस्कारासाठी जोडतात तसे जोडावेत.

दुसरे आसन आहे सुखासन. हे आसन मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. हे आसन करण्यासाठी मांडी घालून बसावे. पाठीचा कणा ताठ ठेवावा. बैठकीखाली पातळ उशी घ्यावी. सुखासन हे सर्वांत सोपे आहे. ध्यानासाठी हे आसन सर्वांत चांगले आहे. तिसरे आसन आहे भुजंगासन. हे पोटावर झोपून केले जाते. हे आसन शरीराला लवचिक बनवते. या आसनामुळे शरीरात स्फूर्ती कायम टिकून राहते. हे करण्यासाठी पालथे झोपावे. दोन्ही तळहात छातीजवळ अंगठे स्तनाग्रहाच्या रेषेत येतील असे ठेवावेत आणि हळूहळू डोके, मान, छाती, पोट क्रमाक्रमाने वर उचलावे. जेणेकरून नाभी जमिनीपासून वर उचलली जाईल परंतु ओटीपोट मात्र जमिनीवरच असेल. दोन्ही पाय सरळ जोडून ठेवावे. दंडासन करण्यासाठी बैठक स्थितीमध्ये पाठ, कणा सरळ ठेवून दोन्ही गुडघे जुळवून पाय लांब करून बसावे. दोन्ही तळहात बैठकांशेजारी जमिनीवर ठेवावे. कोपर सरळ असावे. दृष्टी सरळ समोर असावी.

प्राणायाम नियमित करणे विद्यार्थ्यांठी चांगले आहे. यामुळे डोक्यावरील ताण दूर पळतो आणि एकाग्रता वाढते. यात श्वास हळूहळू पण खोलवर घ्यावा, क्षमतेप्रमाणे श्वास छातीत कोंडून ठेवावा आणि अत्यंत हळुवारपणे दीर्घ कालावधीत उच्छ्वास बाहेर सोडावा.