देशात ‘लोकशाही’ नाही तर ‘हुकूमशाही’ नांदेल ; योगेंद्र यादवांचे खळबळजनक वक्तव्य

मुंबई वृत्तसंस्था : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता एक दिवस शिल्लक असताना स्वराज इंडिया पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. यादव यांनी देशात यापुढे लोकशाही नाही तर हुकूमशाही नांदेल, शिवाय देशातील घटनात्मक व्यवस्था कोसळून जाईल असे विधान करून यादव यांनी खळबळ उडवून दिली आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत योगेंद्र यादव यांनी देशात एनडीएला बहुमत मिळेल आणि भाजप सत्तेवर येईल असे नमूद करताना लोकशाहीचा मात्र अस्त होणार असल्याचे खळबळजनक वक्तव्य केले आहे. देशात भाजपचे सरकार येईल; पण घटनात्मक व्यवस्था राहणार नाही असा दावाही त्यांनी केला आहे.

काँग्रेसवर बोलताना भविष्यात ज्या समस्या देशासमोर उभ्या राहणार आहेत, त्यांना सामोरे जाण्यासाठी काँग्रेस समर्थ नाही. आजवर काँग्रेस सर्व आघाड्यांवर अपयशी ठरली आहे असेही यादव यांनी यावेळी स्पष्ट केले. काँग्रेस हा भाजपाला सक्षम पर्याय नाही असेही यादव यांनी निक्षून सांगितले आहे.

भाजपवर आगपाखड करताना योगेंद्र यादव यांनी भाजपने संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच ताब्यात घेतल्याचा आरोप केला. सामान्य माणूस कधी विचार करू शकणार नाही इतका अमाप पैसा भाजपने निवडणुकीवर खर्च केल्याचा आरोपही योगेंद्र यादव यांनी केला आहे. एकछत्री कारभार काय असतो हे निकालानंतर लोकांना दिसेल असेही त्यांनी नमूद केले.