विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर ज्येष्ठ अभिनेते ‘सोमण’ सक्तीच्या रजेवर, विशिष्ट विचारधारा थोपविण्याचा प्रयत्नांचा आरोप

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन  – मुंबई विद्यापीठातील अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टचे (एमटीए) संचालक आणि ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण यांना तत्काळ रजेवर पाठविण्याचा निर्णय विद्यापीठाने दिले आहे. सोमण यांच्या भोंगळ कारभाराला कंटाळून एमटीएच्या विद्यार्थ्यानी सोमवारी सकाळपासून आंदोलन सुरु केले होते. त्याला शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठिंबा दिला होता. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर मध्यरात्री विद्यापीठ कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी एमटीएमधील प्रवेशाबाबत चौकशी करण्याचे व तोपर्यंत योगेश सोमण यांना रजेवर पाठविण्याचे लेखी पत्र विद्यार्थ्यांकडे दिले.

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार एमटीएच्या एम ए अभ्यासक्रमात २५ विद्यार्थी घेण्याचा नियम असताना योगेश सोमण यांनी ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. तसेच डिम्लोमामध्ये देखील ५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. या विद्यार्थ्यांवर एक विशिष्ट विचारधारा थोपवली जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. शिक्षण देणारे हंगामी शिक्षक हेच मुळात नाटकाचे शिक्षण देण्याच्या पात्रतेचे नाही, अशा शिक्षकांकडून आम्हा विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते असा आरोप करीत विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळपासून आंदोलनास सुरुवात केली होती.

रात्री उशिरा कपिल पाटील यांनी या आंदोलनास प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठिंबा दिला. या आंदोलनाची दखल घेऊन कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी सत्यशोधक समितीचे तातडीने गठण करण्यात येईल. समितीचे कामकाज होईपर्यंत संचालक योगेश सोमण यांना तत्काळ रजेवर पाठविण्यात येईल. चौकशीचा अहवाल येत्या चार आठवड्यात सादर केला जाईल, असे पत्र कपिल पाटील यांच्या हस्ते एमटीए च्या विद्यार्थ्यांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –