साधू संतांचे अच्छे दिन येणार; सरकार पेन्शन देणार

लखनऊ : वृत्तसंस्था- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने कंबर  कसली आहे इकडे महाराष्ट्रात भाजप शिवसेना युती च्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत तर तिकडे उत्तर प्रदेशचे योगी सरकार चक्क साधू संतांना पेन्शन देण्याचा विचार करीत असल्याची माहिती मिळते आहे. खरेतर पेन्शन साठी साधू संतांचा विचार केला जाईल असे कुणालाच वाटले नसेल पण योगी सरकारने अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीस विलंब होत असल्यानं संतप्त झालेल्या साधू संतांना शांत करण्यासाठी हे पाऊल उचलले नसेल ना ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर हा सगळा खटाटोप भाजपाकडे मत वळवण्यासाठी तर नाही ना अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे.

साधू संतांना पेन्शन देण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे. यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त साधू संतांपर्यंत पोहोचण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.

आतापर्यंत राज्य सरकारकडून साधू संतांना पेन्शन दिली जात नव्हती. साधू संतांकडे कागदपत्रं नसल्यानं त्यांना आतापर्यंत पेन्शनचा लाभ मिळत नव्हता, अशी माहिती सरकारमधील सूत्रांनी दिली. मात्र आता प्रत्येक जिल्ह्यात यासाठी शिबिराचं आयोजन करण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. त्यामुळे वृद्धावस्थेतील साधू संतांना पेन्शन मिळू शकेल. राम मंदिरावरुन आक्रमक झालेल्या साधू संतांना शांत करण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

योगी सरकारनं यासाठी साधू संतांना प्रोत्साहन देण्याचं ठरवलं आहे. साधू संतांनाही सरकारी योजनांचा लाभ मिळायला हवा, असं सरकारनं ठरवलं आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याशिवाय आयुष्यमान भारत, उज्ज्वला योजना या योजनांचाही सरकारकडून धडाक्यात प्रसार आणि प्रचार सुरू आहे.