CM योगींना बॉम्बनं उडवण्याची धमकी देणार्‍याचा ‘कबुलीनामा’, म्हणाला – ‘1 कोटी मिळणार होते’, जाणून घ्या कोण आहे आरोपी ?

लखनऊ :  वृत्तसंस्था –   उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या २५ वर्षीय आरोपी कामरान अमीन खान याला मुंबईहून अटक केले होते. अटकेनंतर कामरान खानला एसटीएफच्या ताब्यात घेत चौकशी करत आहेत. चौकशी दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकावण्यासाठी एक कोटी मिळणार असल्याचे कामरान खानने सांगितले. कोणीतरी त्याला एक कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिल्याचे त्याने सांगितले.

एका वृत्तसंस्थेनुसार मात्र, कामरान खानने यूपी एसटीएफला १ कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिलेल्या व्यक्तीचे नाव सांगितले नाही. यूपी एसटीएफ सातत्याने या प्रकरणाची चौकशी करत आहे.

२३ मे रोजी महाराष्ट्र एटीएसने मुंबईहून आरोपी कामरान खानला केले अटक

महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने शनिवारीच (२३ मे) आरोपी कामरान खान याला अटक केली होती. आरोपीने चौकशीत धमकी दिल्याची कबुली दिली होती. न्यायालयात हजर झाल्यानंतर त्याला ट्रान्झिट रिमांडमध्ये पाठवताना यूपी एसटीएफच्या ताब्यात देण्यात आले होते.

२१ मे रोजी रात्री साडेबारा वाजता आला सीएम योगी यांच्यासाठी धमकीचा मेसेज

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना २१ मे रोजी बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. शुक्रवारी एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिस मुख्यालयाच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर धमकीचा मेसेज आला होता. मेसेज करणाऱ्याने आक्षेपार्ह भाषा देखील वापरली आणि एका विशिष्ट समुदायासाठी योगी यांना धोका असल्याचे म्हटले. मेसेजमध्ये लिहिले होते की, ‘मी सीएम योगी यांना बॉम्बने मारणार आहे. (एका विशिष्ट समुदायाचे नाव लिहिले) याच्या जीवाचा तो शत्रू आहे.’

अधिकाऱ्याने सांगितले की, धमकी दिल्यानंतर काही मिनिटांतच राजधानीच्या गोमती नगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली. त्यांनी सांगितले की ज्या नंबरवरून धमकीचा मेसेज आला, तो पोलिसांकडे आहे आणि ते त्या नंबरची कॉल डिटेल तपासत आहे.

२१ मे रोजी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास हा मेसेज आला, त्यानंतर त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिली गेली आणि काही मिनिटांतच गोमती नगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली.

कामरान खानच्या अटकेनंतर नाशिकहून एका संशयिताला अटक

कामरान खानच्या अटकेनंतर यूपी पोलिसांना धमकी देणारा फोन आला होता. महाराष्ट्र एटीएसच्या म्हणण्यानुसार, लखनौ पोलिसांच्या स्पेशल मीडिया डेस्कला हा धमकीचा फोन आला होता आणि म्हटले होते की आता परिणाम भोगण्यास तयार राहा.

एटीएसच्या म्हणण्यानुसार, एका अज्ञात व्यक्तीने धमकी दिली होती. त्याने म्हटले की, आता आरोपीला अटक झाल्यावर त्याचे परिणाम भोगायला सरकार आणि यूपी पोलिसांनी तयार राहावे. यूपी एसटीएफने ही माहिती महाराष्ट्र एटीएसला दिली, त्यानंतर टेक्निकल इंटेलिजन्सच्या आधारे २० वर्षीय व्यक्तीला नाशिकमधून अटक करण्यात आली होती.

कोण आहे आरोपी कामरान खान?

कामरान खान हा मुंबईचा रहिवासी असून पूर्वी तो जव्हेरी बाजारात सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. कामरानचे २०१७ मध्ये स्पाइन टीबीचे ऑपरेशन झाले होते, त्यानंतर त्याने सुरक्षारक्षकाची नोकरी सोडली होती आणि सध्या कोणतेही काम करत नाही. कामरानच्या कुटुंबात त्याची आई, बहीण आणि एक भाऊ आहे. दोन महिन्यांपूर्वी कामरानच्या वडिलांचा मृत्यू झाला होता, जे टॅक्सी चालक होते. कामरानला ड्रग्स आणि नशा करायची सवय होती.