योगी सरकारचा मोठा निर्णय ! उत्तरप्रदेशात 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मोफत

लखनऊ : वृत्तसंस्था –  देशात कोरोनाने कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. यावरून देशातील कोरोना लसीकरण मोहीम व्यापक करण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने १८ वर्षावरील सर्वाना १ मे पासून लस देण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यंमत्री योगी आदित्यनाथ यांनी यूपीतील नागरिकांना कोरोना लस मोफत देण्याचा दिलासादायक निर्णय घेतला आहे.

उत्तर प्रदेश मधील योगी सरकारने १८ वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला गेला. तेथील मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालल्याने तेथे वीकेण्ड लॉकडाउनची घोषणा केली गेली आहे. तसेच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. कोरोनाचा पराभव होईल आणि भारत जिंकेल, असे ट्विट योगी आदित्यनाथ यांनी केले. तर योगी आदित्यनाथ हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत. सध्या ते गृह विलगीकरणात आहेत.

या दरम्यान, उत्तर प्रदेश राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर लखनऊ, वाराणसी, कानपूर, गोरखपूर आणि प्रयागराज या शहरांमध्ये आठवडाभराचा सक्तीला लॉकडाऊन लागू करावा, असा आदेश अलाहाबाद हाय कोर्टाने दिला होता. मात्र, या निर्णयाविरोधात योगी सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यावेळी मुख्यंमत्री योगी आदित्यनाथ सरकारला सुप्रीम कोर्टाने दिलासा देत अलाहाबाद हाय कोर्टाने दिलेल्या लॉकडाऊनच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.