नितीश कुमार पुन्हा कधीच मुख्यमंत्री बनणार नाहीत, लिहून घ्या…

पोलीसनामा ऑनलाइन – “तुम्ही माझ्याकडून लिहून घेऊ शकता की नितीश कुमार १० नोव्हेंबर नंतर पुन्हा कधीच मुख्यमंत्री बनणार नाहीत. माझी यात काहीच भूमिका नसेल, मला फक्त ‘बिहार प्रथम, बिहारी प्रथम’ एवढेच हवे आहे. मला हवे आहे की बिहारमधील चार लाख नागरिकांच्या सूचेनानुसार तयार केले गेलेल्या व्हिजन डॉक्युमेंटनुसार काम केले जावे,” असे म्हणत लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर चिराग पासवान यांनी आज मतदान केले व बिहारमधील जनतेला मतदानासाठी ट्विटरवरुन आवाहन केले आहे. बिहार १st बिहारी १st आणि असंभव नितीश या हॅशटॅगचा त्यांनी वापर केला आहे. ‘बिहरच्या समस्त जनतेला आवाहन आहे, की, स्वतःवर गर्व करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावा. येणाऱ्या सरकारमध्ये बिहारमध्ये बदल झालेला दिसायला हवा. काही कामे झाली पाहिजेत.’

नितीश कुमार भाजपला धोका देतील

दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर नितीश कुमार भाजपला धोका देतील व राजदसोबत युती करतील, असे म्हणत चिराग पासवान यांनी बिहारच्या राजकारणाला एक नवा ट्विस्ट देण्याचा देण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी, २०१५ साली नितीश कुमार यांनी राजदचे नेते लालू प्रसाद यांच्या पाठींब्याने मुख्यमंत्री झाले होते. मात्र, उपमुख्यमंत्री व राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्यावरील कथित घोटाळ्यांच्या आरोपांमुळे गठबंधनमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर करत भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्याच अनुषंगाने चिराग यांनी हे विधान करत नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे.