‘रोहित, काळजी नको… मुख्यमंत्र्यांनी मेगाभरतीचं स्पष्टच सांगितलं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील रिक्त पदांसाठी मेगाभरतीची २० एप्रिल पासून सुरुवात होणार असून, त्यासाठी १ लाख ६ हजारांची आरक्षण पडताळणीही पूर्ण झाली आहे. मात्र या मेगाभरातीला कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवारांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर त्यांनी मुखमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन देऊन परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होईल असेही स्पष्ट केलं.

राज्य सरकारच्या विविध विभागात २ लाखाच्या वर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आहे. त्यामुळे लवकरच मेगाभरती प्रक्रिया सुरु होणार आहे. आधीच्या सरकारने सुरु केलेल्या महापोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या नोकर भरतीचा वाईट अनुभव लक्षात घेता, राज्यातील तरुणांनी ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या नोकर भरतीला तीव्र विरोध केला आहे. तरुणांनी मला आणि अन्य आमदार नेत्यांना भेटून भरती ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याची मागणी केली होती. त्यावेळी ‘रोहित याबाबत तू काहीही काळजी करू नको आणि मुलांनाही तस सांग. यापुढे होणारी भरती ही ऑफलाईन पद्धतीनेच होईल’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं.

सरकारच्या या निर्णयामुळे अधिकाधिक तरुणांना नोकरभरतीच्या प्रकियेत सहभागी होता येणार आहे. भरती करताना एका दिवशीच एका पदासाठी संपूर्ण राज्यात परीक्षा घेण्यास सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितलं. तसेच पूर्वी महापोर्टल वर नोंदणी केलेल्या तरुणांना या भरतीत सामील करण्यात यावं आणि ‘महाराष्ट्र्र लोकसेवा आयोगा’तील सदस्यांच्या रिक्त जागा भरण्यात याव्या आणि ‘एमपीएसच्या माध्यमातून जी पदे भरली जातात त्या पदांची रखडलेली भरती प्रकिया लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी केल्याचे रोहित पवारांनी सांगितले.

निवडणुकीआधी सुप्रिया सुळे यांनी सरकार आल्यावर महापोर्टल बंद करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. ते आश्वासन पाळत महाविकास आघाडी सरकारने महापोर्टल बंद करून एका खाजगी एजन्सीद्वारे परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार महाआयटी विभागाच्या माध्यमातून सक्षम अशी खाजगी एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. दोन दिवसात त्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्या जाणार असून सामान्य प्रशासन विभागातर्फे परीपत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यामध्ये शासकीय भरती कशी राबवायची याबाबत माहिती दिली आहे. असे महाआयटी चे मुख्यअधिकारी अजित पाटील यांनी सांगितले.