‘…अन्यथा इंधनाचे दर एवढे वाढतील की विचार करणेही कठीण होईल’ : सौदीच्या प्रिन्सची धमकी

रियाद : वृत्तसंस्था – सौदीच्या सरकारी रिफायनरीवर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ड्रोन, मिसाईलद्वारे हल्ला करण्यात आला होता. यावर सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी पहिल्यांदाच वक्तव्य केलं आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेने आरोप केला होता की, हा हल्ला इराणने केला आहे. सौदीनेही या हल्ल्यामागे इराण असल्याचे म्हटले होते. या हल्ल्याची जबाबदारी येमेनच्या हुती विद्रोहींनी घेतली होती. सलमान यांनी आता यावर भाष्ये केलं आहे. मोहम्मद बिन सलमान यांनी साऱ्या जगाला गंभीर इशारा दिला आहे. कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली तर सर्वाधिक फटका हा भारताला बसणार आहे.

‘तेलाच्या किंमती एवढ्या वाढतील की या किंमतींचा विचार करणेही कठीण होईल’

इराण विरोधात जगाने एकत्र आले पाहिजे अन्यथा कच्च्या तेलाच्या किंमती एवढ्या वाढतील की, या किंमतींचा विचार करणेही कठीण होईल अशी धमकीच मोहम्मद बिन सलमान यांनी दिली आहे. इराणुळे कच्च्या तेलाचा पुरवठा बाधित होणार असून तेलाच्या किंमती एवढ्या वाढतील की, या किंमती आम्ही आयुष्यात पाहिल्या नसतील असा गंभीर इशारा सलमान यांनी दिला आहे. यासाठी इराण जबाबदार असेल असेही त्यांनी म्हटले आहे.

‘आम्ही इराण वादावर सैन्य नाही तर राजकीय तोडगा काढण्याचा विचार करतोय’

अमेरिकन चॅनल सीबीएसला दिलेल्या मुलाखतीत सलमान म्हणाले, “सौदी अरेबियातील तेलाच्या रिफायनरीवर हल्ला ही इराणकडून युद्धाची सुरुवात होती. यानंतर आम्ही इराण वादावर सैन्य नाही तर राजकीय तोडगा काढण्याचा विचार करत आहोत. कारण युद्धामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होईल. अमरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांना भेटून अणू कराराबाबत चर्चा करायला हवी” असेही ते म्हणाले.

सौदीकडून दावा करण्यात आला आहे की, एवढी अद्ययावत हत्यारे हुती विद्रोही चालवू शकत नाहीत. असे असले तरी इराण मात्र या हल्ल्यामागे हात असल्याचे नाकारताना दिसत आहे.

Visit : policenama.com