आता ‘त्यांना’ राष्ट्रवादीत पहिले स्थान नाही : जितेंद्र आव्हाड

ठाणे : पोलिसनामा ऑनलाईन – आगामी महापालिका निवडणुकांमुळे राजकीय वातावरण आतापासूनच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ठाणे आणि नवी मुंबईत विविध विकासकामे आणि भेटी गाठींचा सपाटाच लावला आहे. अंबरनाथ-बदलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आयाराम-गयारामांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारची कामगिरी उत्तम असून कोरोनाकळतही सरकारने चांगले काम केलं आहे. या भागासाठी माजी मंत्री स्वर्गीय नेते आर.आर.आबा आणि मंत्री अजित पवार यांनी मोठ्या प्रमाणात विकासक्रमांकडे लक्ष दिल. नेवळी फाटा ते बदलापूरचा टर्न या भागात एकही खड्डा नाही. कथोरेंना या दोन्ही नेत्यांनी भागाचा विकास करण्यासाठी मोठयाप्रमाणात निधी दिला पण त्यांनी पक्ष का सोडला हेच आम्हाला समजत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी सोडून गेलेल्या स्थानिक नेत्यांवर टीका करत पक्ष सोडून गेलेले अथवा नवीन येणाऱ्यांना पक्षात पहिले स्थान मिळणार नाही असेही त्यांनी सुनावलं.

ठाणे आणि नवी मुंबईतील जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम आणि उद्घाटन सोहळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हजेरी लावली. अंबरनाथ-बदलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यसही खासदार सुळे उपस्थित होत्या.

आव्हाड म्हणाले, कथोरेंचा अपमान होईल असे कधीही शरद पवार ना आर आर पाटील ना अजित पवार वागले नाही. त्यांचे काम वाखाण्याजोगे आहे यात शंका नाही. पण कामासाठी सहकार्य करणारा राष्ट्रवादी पक्ष सदैव आपल्या पाठीशी होता हे आपण कसे विसरलात ? असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित करत ठाणे जिल्ह्यातील कथोरेंविरुद्धची लढाई ही प्रामाणिक विरुद्ध गद्दार अशीच असली पाहिजे. एका तिकिटासाठी तुम्ही भाजपात गेला. हि सल कार्यकर्त्यांच्या मनात कायम राहते. त्यामुळेच, आशिष दामलेंसारख्या युवकांनी स्थानिक निवडणुका गंभीरतेनं घ्यायला हव्यात, कारण या परिणामकारक असतात.

भाजपात गेलेले परत येतील आणि त्यांना महत्त्वाचं स्थान मिळेल, असा विचार आपण करु नका. त्यांना ते स्थान अजिबात देणार नाही. माझं तर स्पष्ट मत आहे, ते मी पवारसाहेब आणि सुप्रिया सुळेंना बोलून दाखवलंय. येणाऱ्यांनी यावं, आम्ही सर्वांचं स्वागत करु, तुम्ही आमच्याच घरातले आहात. पण, पुढच्या बाकावर बसायला मिळेल, हा विचार करुन येऊ नका. थोडंस दोन वर्षे तुम्हाला वेटींग करावं लागेल, असे आव्हाड यांनी सांगितलं.

भाजप सरकार आरक्षण काढणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आंदोलनजीवी शब्दावरुन आव्हाड यांनी टीका केली. ते म्हणाले कि, श्रेष्ठ नाटककार नरेंद्र मोदी हे आपल्यावर भुलभुलैया करण्याचं काम करतात, देशाच्या मालकीच्या कंपन्या विकण्याचा मोदी सरकारने धडाकाचा लावलाय, येणाऱ्या काळात भाजप सरकार आरक्षण काढेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हळूच बाजूला सारेल, असं माझं स्पष्ट मत आहे, असेही आव्हाड यांनी म्हटलं. आपल्याला भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा ज्या संविधानामध्ये अधिकार देण्यात आलाय, त्याचं संविधानातील अधिकार काढण्याचा प्रयत्न मोदी करत आहेत. आंदोलनजीवी को रोखना होगा, याचा अर्थ काय? असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला. अंबरनाथ बदलापूरमधील पाण्याचा प्रश्न किती उग्र आहे, हे येथील महिलांना माहित आहे. ठाण्याचे खासदार कधी इकडे फिरकले का? असं प्रश्न विचारत शिवसेनेवर नाव न घेता टीका केली.

इंधन दरवाढीवरून टीका
काँग्रेसच्या काळात पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरुन एकेकाळी ज्येष्ठ कलावंतापासून ते अनेकांनी काँग्रेस व डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली होती. पण, आज सगळे चडीचूप आहेत. पेट्रोल दरवाढीवरुन भाजपाने २०१२ पासून २०१४ पर्यंत कायम टीका केली, त्यावेळी स्मृती इराणी सर्वात पुढे होत्या. मग आता काय झाल असे म्हणत केंद्र सरकार हम करे सो कायदा या विचाराने हे चालू असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.