आजारांना दूर ठेवायचे, तर ‘या’ रानभाज्या ठरतील संजीवनी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रानभाज्या या जास्त करुन जंगलात, शेताच्या बांधावर, माळरानावर येतात. सेंद्रीय भाज्यांकडे लोकांचा कल वाढल्याने रानभाज्यांची माहिती असणे गरजेचे आहे. जेवढे जीवनसत्व रानभाज्यामध्ये असते तेवढे सेंद्रीय भाज्यांमध्ये मिळत नाही. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर अशा तांदुळजा, काठमाट, तरवटा, कुरडू, घोळ, पालक, पाथऱी, करटोली अशा चविष्ट आणि आरोग्यदायी रानभाज्यांची शहरी लोकांना ओळख व्हावी यासाठी कृषि विभागाकडून रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

पावसाची रिपरिप सुरु झाली, की रानभाज्याही डोकावू लागतात. या भाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्माची जाण असलेले त्यांच्याकडे पाठ फिरवत नाहीत. यांत अनेक औषधी गुणधर्मही असतात. त्यामुळे रानभाज्या आवर्जून बनवून खाल्ल्या जातात. सध्याच्या काळात बाजारपेठेत भाज्यांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. वाढती मागणी पुर्ण करण्यासाठी उत्पादन वाढले पाहिजे, यासाठी रासायनीक खतांचा वापर, रासायनिक अन्नद्रव्याचा वापर सुरु झाला आहे. उत्पादनात वाढ झाली मात्र त्याची नैसर्गिक चव आणि त्यातील प्रतिकारशक्ती कमी होत आहे.

गटशेतीचे प्रणेते डॉ. भगवानराव कापसे म्हणाले, की रानभाज्यामध्ये टाळका, तरोटा, तरवटा नावाने ओळखल्या जाणाऱ्या या भाजीच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. करटोली किंवा रानकारली नावाने ओळखली जाणारी फळभाजी, ब्लेडने कापल्यासारखी लांब पानांची पाथरीची भाजी, कपाळफोडीच्या पानांची भाजी, कुर्डूची भाजी, लाल आणि हिरवट रंगाची घोळची भाजी. त्यातही मोठ्या पानांची आणि बारिक पानांची घोळची भाजी खायला खूप चांगली लागते.

या रानभाज्या निसर्गात आपोआप उगवत असतात. याची ग्रामीण भागातील लोकांना आणि आदिवासींना माहिती असते. याची शहरी भागातील लोकांना ओळख व्हावी, त्यांचे आरोग्याच्या दृष्टीने फायदे कळावेत यासाठी कृषि विभागाकडून रानभाज्या महोत्सावचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती डॉ. कापसे यांनी दिली.