बेपत्ता तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला, प्रचंड खळबळ

औरंगाबादः पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या अडीच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचे प्रेत कुजलेल्या व झाडाला लटकलेल्या अवस्थेत मंगळवारी (दि. 13)  आढळून आला. कन्नड जवळील चंदन नाल्याजवळ ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

भगवान प्रभाकर पवार (वय 23 रा. खातखेडा ता.कन्नड) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो गेल्या अडीच महिन्यांपासून बेपत्ता होता.

कन्नड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही मुले मंगळवारी (दि.13)  संध्याकाळी साडेपाच वाजता कन्नड-पिशोर रस्त्यावरील चंदन नाल्याजवळ करवंद गोळा करण्यासाठी डोंगरावर गेले होते.  त्यावेळी सागाच्या एका झाडाला दोरीच्या साहाय्याने लटकलेला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह त्यांना दिसला. या मुलांनी तात्काळ ही माहिती कन्नड पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला. तपासात घटनास्थळी एका बॅगमध्ये आधार कार्ड व इतर काही साहित्य आढळून आले. आधार कार्डवरील नोंदीवरून हा मृतदेह भगवानचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी खातखेडा येथे संपर्क साधला असता हा तरुण 25 जानेवारीला कन्नडला गाडीवर कामाला जातो असे सांगून गेला होता. परंतु 30 जानेवारीपर्यंत  तो घरी आला नाही. त्याचा मोबाईल सुद्धा बंद असल्याने त्याचे वडील प्रभाकर संपत पवार यांनी पिशोर पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. कन्नड पोलिस तपास करत आहेत.