प्रेम प्रकरण उघड होण्याच्या भीतीनं मित्रानंच काढला जीवाभावाच्या मित्राचा काटा ! नंतर केलं त्याचा शोध घेण्याचं नाटक

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन –   एका बेपत्ता तरूणाचा मृतदेह सापडल्यानं बोईसर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस तपासात अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी बोईसर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे यातील एक आरोपी असा होता ज्यानं खून तर केलाच सोबत तो मृत मित्राला शोधण्यासाठी त्याच्या कुटुंबासोबत फिरण्याचा बनाव करत होता. तपासात हा प्रकार उघड झाला आहे.

नेमकं काय घडलं ?

बोईसर परिसरातील अवधनगर रोशन गॅरेज गल्ली येथे राहणारा शिवरत्न राय (उर्फ शिवम) हा शनिवारी 22 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता घरात जेवण झाल्यानंतर बसला होता. त्याला त्यांचा मित्र अबुझर लयीयास सिद्दीकी यानं व्हॉट्सअॅप कॉल करून बाहेर बोलवलं. शिवम राय घरात काहीही न सांगता बेपत्ता झाला होता. बुधवार दि 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी तारापूर औद्योगिक क्षेत्रातील गंगोत्री हॉटेल समोर असलेल्या झुडपांमध्ये आढळून आला.

कसा काढला काटा ?

अबुझर सिद्दीकी (वय 19) यानं शिवमला व्हॉट्सअॅप कॉल करून बाहेर बोलावल्यानंतर गंगोत्री हॉटेल समोरील मैदानात निर्जन स्थळी नेऊन त्याला बेदम मारहाण केली. यानंतर त्याचा गळा आवळून त्याला ठार मारलं. अबुझर सिद्दीकी आणि त्याचा मित्र आरिफ खान यांनी शिवमचा मृतदेह तेथेच बाजूला असणाऱ्या झुडपात फेकला होता.

मित्राच्या खुन्याला शोधण्याचा केला बनाव

सुरुवातीला अबुझर शिवमच्या कुटुंबीयांसोबत त्याचा घेण्यासाठी फिरतानाचा दिखावा करत होता. सुरुवातीला पोलिसांनी त्याचीही चौकशी केली होती.

दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात

बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आशिष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई वैभव जामदार, अशपाक जमादार, देवा पाटील, वाघचौरे, हवालदार मर्दे यांनी गुन्ह्याचा संपूर्ण उलगडा केला. गुन्हा केल्याचं उघड झाल्यानंतर आता अबुझर सिद्दीकी आणि आरिफ खान यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलीस उपनिरीक्षक आशिष पाटील हे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.