भिवंडीत तरूणाची गळफास घेवुन आत्महत्या, भोसरीत देखील युवकानं जीवन संपवलं

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन – येथील फातिमानगर परिसरात एका झाडाला तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदरील तरुणाचं नाव सुफियान अन्सारी असं आहे. सुफियानचा मृतदेह रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला लटकलेला अवस्थेत मिळाला. मृतदेह आढळून आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी याबद्दल पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी जात तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला. पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून देण्यात आला. सुफियान अन्सारीने आत्महत्या केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं. पण अद्याप कारण समजू शकले नाही. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत. काल राज्यात घडलेली ही चौथी आत्महत्या होती.

पुण्यात २४ वर्षीय तरुणाची आत्महत्या
पुण्यात Whatsapp वरती स्टेट्स टाकून इंजिनिअर असलेल्या अक्षय पोतदार (वय २४) या तरुणाने आत्महत्या केली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील मोशी भागात घडली असून, तरुणाने इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे.

एका खासगी कंपनीत इंजिनिअर पदावर काम करत असलेला अक्षय चिखली परिसरातील साने चौकात मित्रांसोबत राहत होता. बुधवारी त्याने इमारतीच्या टेरेसवरती जाण्यासाठी सिक्युरिटी गार्डकडे चावी मागितली पण सिक्युरिटीने दिली नाही. परत दुसऱ्या सिक्युरिटी गार्डला प्लॅट दाखवण्याच्या बहाण्यातून चावी मागून घेतली. त्यानंतर या तरुणान ११ व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. हा प्लॅट एक महिन्यापासून बंद होता. पोलीस पुढील तपास करत आहेत.

भोसरीत गळफास घेऊन आत्महत्या
भोसरीमध्ये तिसरी घटना घडली. ठेकेदाराने पगार न दिल्याने बांधकाम साईटवर काम करणाऱ्या सुपरवायझरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दापोडी येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात ही घटना घडली आहे. रवींद्र सिंग (वय ४५) असं मृत सुपरवाझरचे नाव आहे.

क्वारंटाईन असलेल्या तरुणाची आत्महत्या
तर उस्मानाबाद मध्ये चौथी घटना घडली आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या एका तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. येडशी गावातील सरपंच यांच्यासोबत बार्शी तालुक्यातील पांगरी गावातील ३ जण व येडशी गावातील ६ जण असे ९ जण पास काढून तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. गावात परत येताच या ६ जणांना गावातील जिल्हापरिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. त्याने ३ दिवसांपूर्वीच विष प्राशन केले होते. मात्र काल उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.