Rahuri News : पुन्हा लॉकडाऊन लागण्याच्या भीतीनं तरुणाची आत्महत्या !

राहुरी : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना काळात आत्महत्येच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पुन्हा एकदा कोरोना वाढताना दिसत आहे. अशात पुन्हा लॉकडाऊन लागलं तर काय करायचं या भीतीपोटी एकानं आत्महत्या केली आहे. राहुरीतून काल एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राहुरी पोलीस स्टेशन परिसरातील एका तरुणानं सोमवारी राहत्या घरात पत्र्याच्या अँगलला साडीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यानं बचत गटाचं कर्ज काढलं होतं. जर पुन्हा लॉकडाऊन लागलं तर कर्जाचे हप्ते कसे देणार या चिंतेनं त्यानं आत्महत्या केल्याचं त्याच्या मित्रांनी सांगितलं आहे. विष्णु आबासाहेब गांगुर्डे (वय 30, रा. गौतम नगर, रेल्वे स्टेशन, राहुरी) असं आत्महत्या करणाऱ्या मृत तरुणाचं नाव आहे.

विष्णु मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्यानं बचत गटाचं कर्ज घेतलं होतं. मित्रांकडूनही काही पैसे हात उसने म्हणून घेतले होते. पुन्हा कोरोना संसर्ग वाढत आहे आणि पुन्हा लॉकडाऊन होईल या भीतीनं तो चिंतीत होता.

असं झालं आपण कर्ज कसं फेडणार याची चिंताही त्यानं बोलून दाखवली होती. त्याच्या मित्रांनी याबाबत सांगितलं आहे. आता त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. राहुरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.