जळगाव : युवकाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या

जळगाव : पोलिसनामा ऑनलाइन – येथील एका तरुणाने बाहेर फिरून येतो असे सांगून धावत्या रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशाल शांताराम पवार (वय २७, रा.दापोरा, ता.जळगाव) असे या तरुणाचे नाव असून, ही घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजता शिरसोली शिवारात घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नातेवाईकांनी सांगितल्यानुसार, विशाल शांताराम पवार हा आपल्या आई आणि बहिणीसोबत दापोरा येथे राहत होता. शिक्षणासह विशाल आईसोबत मोलमजुरी करून घरात हातभार लावत असे. मात्र, मागील काही दिवसांपासून कर्जबाजारी झाल्याने तो तणावात होता. तथापि, २९ मार्च रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास बाहेर जाऊन येतो असे सांगून विशाल दुचाकीने घराबाहेर पडला.

शिरसोली आणि दापोरा दरम्यानच्या भागात दुचाकी लावून त्याने धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केली. याबाबत गँगमन पांडे यांनी तातडीने स्टेशन मास्तर यांना कळवले. त्यानंतर तालुका आणि एमआयडीसी पोलिसांनी धाव घेत मयताच्या खिश्यातील कागदपत्राच्या आधारे ओळख पटवली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.